‘११.५.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना आलिंगन देतांनाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. ते पाहून ‘कलियुगात श्रीराम आणि श्री हनुमान एकमेकांना आलिंगन देत आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी मला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

१. ‘हनुमानाप्रमाणे भक्तीभावाने सेवा करणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीरामाच्या रूपात आलिंगन देत आहेत’, असे वाटणे
हनुमानाप्रमाणे सेवा करणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीच्या मुक्ततेसाठी लढा दिला होता आणि तो लढा त्यांनी जिंकलाही होता. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील त्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या) भेटीचे छायाचित्र पाहून ‘हनुमान श्रीरामाचे कार्य पूर्ण करून आले आहेत, तसेच ते विजयी होऊन आले आणि त्यांना श्रीरामाच्या रूपात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आलिंगन दिले आहे’, असे मला वाटले. गुरुदेव इतक्या प्रेमाने त्यांना हृदयाजवळ घेत आहेत, हे पाहून ‘गुरुदेवांना पू. जैन यांच्यामध्ये विजयी झालेला आणि भक्तीभाव असणारा हनुमंतच दिसला असावा’, असे मला वाटले.
(‘प्रतिवर्षी अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने पू. जैन यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आणि अनन्य भक्ती आहे. त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत स्वतःच्या समवेत आहेत’, असे वाटते. हिंदु राष्ट्राचे (रामराज्याचे) उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना स्मरून आणि त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेने पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी तो लढा लढला होता. स्थुलातून त्यांनी लढला आणि त्यातील सूक्ष्मातील कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केले, अशी पू. जैन यांची श्रद्धा आहे.’ – संकलक)
२. पू. हरि शंकर जैन यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती हनुमानाप्रमाणे अत्युच्च भक्तीभाव असणे
त्रेतायुगातही हनुमानाने श्रीरामाचे कार्य करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट केले होते. त्याच्या मनातही प्रभु श्रीरामाप्रती अत्युच्च भक्ती होती; म्हणूनच तो प्रत्येक वेळी श्रीरामाच्या कार्यात विजयी झाला आणि त्याने प्रभूंचे मन जिंकले. ‘तसाच भाव पू. हरि शंकर जैन यांचा गुरुदेवांप्रती आहे’, असे मला जाणवले.
३. हनुमानाची दास्यभक्ती, निष्ठा, तळमळ, समर्पणभाव या सर्वांमुळे ते प्रभूंचे कार्य कुशलतेने करू शकले, तसेच पू. जैन यांच्याविषयी जाणवते.

४. पू. जैन यांनी हनुमंताप्रमाणे रामजन्मभूमी लढ्याच्या कार्यात हातभार लावला असणे
महर्षींनी सांगितल्याप्रमाणे गुरुदेव सध्याच्या कलियुगातील श्रीविष्णूचे जयंतावतार आहेत. त्रेतायुगात हनुमंताने श्रीरामाच्या कार्यात हातभार लावला होता. त्याचप्रमाणे कलियुगातही पू. जैन यांनी अवघड आणि जवळजवळ अशक्य असलेला अयोध्या येथील श्री रामजन्मभूमीसाठीचा लढा दिला आणि ते यशस्वी झाले.
५. पू. जैन यांच्या मनात श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्यभाव असणे
हे कार्य केवळ श्रीरामाची अखंड कृपा, श्रीरामाचे भरभरून आशीर्वाद, ईश्वराप्रतीची भक्ती असलेली व्यक्तीच करू शकते. पू. जैन यांच्या मनात श्रीरामस्वरूप असलेले गुरुदेव यांच्याप्रती अनन्यभाव आहे. यामुळेच ते विजयी झाले आणि संपूर्ण विश्वाला आज हा सुवर्ण दिन पहायला मिळत आहे.’
– सौ. वेदश्री हर्षद खानविलकर, फोंडा, गोवा. (१२.२.२०२४)