चैत्र कृष्ण अष्टमी (२१.४.२०२५) या दिवशी पू. सौरभ जोशी (सनातनचे ३२ वे संत, वय २९ वर्षे) यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्त मान्यवर आणि संत यांनीपू. सौरभदादा यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार येथे दिले आहेत.
‘पू. सौरभ जोशी, पिंगुळी (कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे वास्तव्याला असतात. ते विकलांग आहेत. पूर्वी ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे साधक, संत, महंत, शंकराचार्य अशा अनेकांचा सहवास पू. सौरभदादा यांच्यासह आम्हाला लाभला. २८.३.२०२५ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठ ७ वर ‘मरण – एक आनंदसोहळा !’ हा श्रीमती रजनी साळुंके यांचा लेख प्रकाशित झाला होता. तो लेख वाचल्यानंतर पू. सौरभदादा यांच्याविषयीचे काही प्रसंग आम्हाला आठवले.

पू. सौरभ जोशी यांच्या चरणी त्यांच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. एका क्षेत्रातील एक तज्ञ रामनाथी आश्रमात पू. सौरभदादांना भेटल्यावर म्हणाले, ‘‘यांची प्रभावळ (ऑरा) पुष्कळ मोठी आहे. यांच्या शक्तीचा पुढे कार्यासाठी उपयोग होणार आहे.’’
२. एका संतांनी ‘पू. सौरभदादा असामान्य आहेत’, असे सांगणे
एक संत रामनाथी आश्रमात आल्यावर पू. दादांना भेटण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी पू. दादांच्या मस्तकावर फुले वाहिली. त्यानंतर त्यांनी अकस्मात् पू. दादांच्या चरणांवर फुले वाहिली. त्या संतांच्या समवेत असलेल्या साधकाने त्यांना पू. दादांची ओळख करून दिल्यावर ते संत म्हणाले, ‘‘मला ठाऊक आहे की, ते केवळ संत नाहीत, तर असामान्य आहेत आणि म्हणूनच मी त्यांच्या चरणांचे पूजन केले.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पू. सौरभ जोशी यांच्याबद्दल काढलेले गौरवाद्गार !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कर्तेकरविते आहेत; मात्र ते कधीही ‘मी केले’, असे सांगत नाहीत. एकदा ते म्हणाले, ‘‘पू. सौरभदादांसारखे संत आहेत; म्हणून सनातन संस्थेचे कार्य चालू आहे.’’ त्यांनी असे म्हणणे, म्हणजे ‘हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ८१) (अर्थ : हे माझ्यामुळे झाले; पण मी केले नाही.) असे म्हणण्यासारखे आहे आणि तो त्यांचा मोठेपणा आहे. ‘एकोऽहं बहु स्याम् ।’ (तैत्तिरीयोपनिषद्, ब्रह्मवल्ली, अनुवाक ६) (अर्थ : मी एक आहे, माझे अनेकात रूपांतर व्हावे) या उक्तीनुसार ते स्वतःप्रमाणे इतरांनाही विविध स्तरांवर कार्य करण्यासाठी सिद्ध करत आहेत. त्यांनीच
पू. सौरभदादांना घडवले आणि ते पू. सौरभदादांकडून कार्यही करून घेत आहेत.’
– श्री. संजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा आणि सौ. प्राजक्ता जोशी, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग. (२८.३.२०२५)
३. ‘पू. सौरभदादा ईश्वराशी संपूर्णत: एकरूप झालेले असतील’, असे एका संतांनी सांगणे
एका संतांनी पू. दादांविषयी बोलतांना सांगितले, ‘‘हे जेव्हा देहत्याग करतील, तेव्हा तुम्ही दु:ख मानू नका. त्यांना पुनर्जन्म नसल्याने ते ईश्वराशी संपूर्णत: एकरूप झालेले असतील. ‘ईश्वराशी एकरूप होणे’, हा एक आनंद सोहळाच असतो आणि लक्षावधी जिवांतून तो एखाद्यालाच प्राप्त होतो.’’
४. ‘इदं न मम ।’ म्हणजे ‘हे माझे नाही’ या वचनाप्रमाणे ‘पू. सौरभदादा म्हणजे स्वतःकडे कर्तेपणा न घेता सूक्ष्म स्तरावर कार्य करण्यासाठी अवतरलेला जीव आहे’, असे एका संतांनी सांगितले.
५. पू. सौरभदादा यांची ‘सत् चित् आनंद’ स्थिती
एका संतांनी पू. दादांविषयी सांगितले होते, ‘‘वानस्पत्य अवस्थेतही स्वतः आनंदात राहून इतरांना आनंद देणे, हे कुणालाच शक्य नाही; मात्र पू. दादा अनेक वर्षांपासून सत् चित् आनंदात आहेत.’’ (टीप : ज्याप्रमाणे ‘वनस्पती’, म्हणजे वृक्ष एखाद्या ठिकाणी अनेक वर्षे स्थिर रहातो, त्याप्रमाणे मनुष्यही काही वेळा एकाच ठिकाणी बसून रहातो किंवा पडून रहातो, उदा. अंथरुणाला खिळून रहातो. याला ‘वानस्पत्य अवस्था’ असे म्हणतात.)
६. प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक म्हणतात, ‘‘पू. सौरभदादा यांच्यासारख्या अलौकिक संतांना केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ओळखू शकले.’’
७. ‘‘पू. सौरभदादांसारखे काही असामान्य जीव जन्म-मृत्यूच्या चक्रात न अडकण्यासाठी असा देह धारण करतात’’, असे परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले.
८. ‘‘अनेक वर्षे एकाच शारीरिक स्थितीत असूनही शरिरावर कोणताही व्रण न होणे, म्हणजे साक्षात् वायुदेवता पू. सौरभदादांना सांभाळत आहे’’, असे प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितले होते.
९. पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी पू. सौरभ जोशी यांच्याबद्दल काढलेले उद्गार

एकदा शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी प.पू. डॉक्टर त्यांना घेऊन पू. दादांच्याकडे आले होते. प.पू. डॉक्टर त्यांना पू. दादांविषयी सांगत असतांनाच शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती म्हणाले, ‘‘ये तो योगी है !’’
१०. ‘पू. सौरभदादा यांच्याकडे दैवी शक्ती आहे आणि त्यांचा जन्म केवळ ईश्वरी कार्य करण्यासाठी झाला आहे’, असे अनेक संतांनी सांगितले आहे.
११. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ पू. दादांना भेटतात. तेव्हा त्या म्हणतात, ‘‘पू. दादा किती आनंदात असतात ! अशा स्थितीत राहून सतत आनंदी असणे कठीण आहे.’’
‘सर्वांनी पू. दादांचे कौतुक करणे आणि ते अलौकिक असल्याचे सांगणे’, हा केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाचा वर्षाव आहे. त्यांनीच पू. दादांना अशा कौतुकास्पद स्थितीला नेले आहे. आम्हाला पू. सौरभदादांसारख्या संतांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही प.पू. गुरुदेवांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. ‘प.पू. गुरुदेव, पू. सौरभदादा, ‘आपले कृपाशीर्वाद आम्हा सर्वांना लाभोत’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. संजय जोशी (पू. सौरभ जोशी यांचे वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा आणि सौ. प्राजक्ता जोशी (पू. सौरभ जोशी यांच्या आई), पिंगुळी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२८.३.२०२५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |