‘२०.६.२०२४ या दिवशी मी दुचाकीवरून पडून माझा अपघात झाला. या अपघाताच्या वेळी आणि अपघातानंतर ‘मी अनुभवलेली गुरुकृपा, तसेच आताही गुरुच मला पदोपदी साथ देऊन सर्व परिस्थितीत आनंदी ठेवून त्यातूनही साधना कशी करून घेतात?’, याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. दुचाकी डंपरला आपटून अपघात होणे
१ अ. अपघात झाल्यावर दुचाकीवर असलेला गॅस सिलिंडर साधकाच्या पायावर पडणे आणि झालेल्या भीषण अपघातात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी फुलासारखे मार्गावर उचलून ठेवले आहे’, असे साधकाला जाणवणे : ‘२०.६.२०२४ या दिवशी सकाळी ११.४५ वाजता मी दुचाकीवरून जात असतांना रायकर देवस्थान, आडेली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे डंपरला माझी दुचाकी आपटून अपघात झाला. या वेळी गाडीवर असलेला ‘गॅस सिलिंडर’ माझ्या पायावर पडला. हा अपघात एवढा मोठा होता की, माझ्या गाडीचे तीन तुकडे झाले. मी मार्गावर मध्येच पडलो होतो; पण केवळ गुरुकृपेमुळे त्या वेळी मागून कोणतेही वाहन आले नाही. माझा एवढा मोठा अपघात होऊनही ‘मला कुणीतरी अगदी फुलासारखे उचलून मार्गावर ठेवले आहे’, असे मला जाणवले. मला मार्गावर अलगद ठेवणारे प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) होते. हे मला या अपघाताची भीषणता पाहिल्यावर लक्षात आले.
१ आ. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती केल्यावर नामजपादी उपाय करणे आणि पायाला ३८ टाके घालूनही कोणताही त्रास न होणे : मला अन्यत्र तशी कोणती मोठी दुखापत झाली नव्हती; मात्र सिलिंडर पायावर पडल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाल्याचे माझ्या लक्षात आले. मला आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले. या वेळी माझे नामजपादी उपायही चालू होते, तसेच मी अत्तर आणि कापूर यांचे आध्यात्मिक स्तरावरील उपायही करत होतो. यामुळे पायाला ३८ टाके घालूनही मला तसा कोणताही त्रास जाणवला नाही.
१ इ. अपघाताचा प्रसंग घडूनही मनात सेवेचेच विचार असणे आणि ‘साधक (मी) करत असलेल्या सेवेचे दायित्व अन्य साधकाला दिले आहे’, हे समजल्यावर साधक (मन) निश्चिंत होणे : या वेळी माझ्या मनात माझ्याकडे असलेल्या सेवांच्या संदर्भात विचार होते. माझे लक्ष दुखण्याकडे नसून त्या सेवेकडेच होते. तेव्हा एका साधकाने सांगितले, ‘‘तुझ्या सेवेचे दायित्व अन्य एका साधकाला दिले आहे.’’ हे समजल्यावर मी निश्चिंत झालो. सद्गुरु स्वाती खाडये यांनी माझे या प्रसंगाविषयी नंतर त्यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळी कौतुक केले.
२. पायाला गंभीर जखम झाल्यामुळे पुढील उपचारासाठी बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात नेण्यात येणे
२ अ. रुग्णालयात पुढील उपचारांसाठी जातांना ‘साधक समवेत असल्यामुळे प्रवासात ऊर्जा मिळत आहे’, असे जाणवणे : माझ्या पायाची जखम अधिकच गंभीर असल्यामुळे मला बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी नेण्यात आले. आम्ही संध्याकाळी ७.३० वाजता बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात पोचलो. या दोन घंट्यांच्या प्रवासात माझ्या समवेत साधक होते. त्यामुळे मला ‘प्रवासातही ऊर्जा मिळत आहे’, असे जाणवले. या वेळी उत्तरदायी साधकांनी मला नामजपादी उपाय सांगितले. त्या वेळी मला प.पू. गुरुदेवांची कृपा अनुभवता आली. या रुग्णवाहिकेत आधुनिक वैद्य हे साधकच होते. त्यामुळे मला मोठा आधार वाटला.
२ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा असल्यामुळे त्या सेवेसंदर्भात उत्तरदायी साधकांना विचारणे आणि त्यांनी ‘सेवेची चिंता करू नका’, असे सांगून आश्वस्त करणे : माझ्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा असल्यामुळे मी सहसाधकांना ‘आजच्या दैनिक वितरणाच्या सेवेसाठी कोण जाणार ?’, याची विचारणा केली. त्या वेळी या सेवेचे उत्तरदायित्व असलेल्या सेवकांनी ‘तुम्ही या सेवेची चिंता करू नका. आम्ही त्याची व्यवस्था करू. तुम्ही केवळ तुमची काळजी घ्या’, असे सांगून मला आश्वस्त केले.
२ इ. पायातून होणारा रक्तस्राव थांबत नसल्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांनी ‘शस्त्रकर्म करता येणार नाही’, असे सांगणे : तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी माझे सर्व वैद्यकीय अहवाल तयार केले. त्या रात्री १२.३० वाजता मला शस्त्रकर्म कक्षात नेले. त्या वेळी माझ्या पायातून होणारा रक्तस्राव थांबत नसल्यामुळे तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी ‘आता तुमचे शस्त्रकर्म करता येणार नाही’, असे मला सांगितले.
२ ई. शस्त्रकर्म करण्याचा निर्णय होऊन गुडघ्यापासून खालील पाय कापावा लागणे : परिचारिका प्रतिदिन माझ्या जखमेवर मलमपट्टी करत होत्या. सहाव्या दिवशी वैद्यकीय अधिकार्यांनी मला ‘तुझा गुडघ्यापासून खालील पाय कापावा लागणार आहे’, असे सांगितले. आठव्या दिवशी माझे शस्त्रकर्म झाले.
२ उ. शस्त्रकर्म चालू असतांना शस्त्रकर्म कक्षात मला प.पू. गुरुदेवांचे शंकराच्या रूपात दर्शन झाले.
२ ऊ. रुग्णालयात असतांना विज्ञापने मिळवण्याची सेवा करणे : गुरुपौर्णिमा जवळ येत होती. मला माझ्या दुखण्याची चिंता वाटत नव्हती, तर मनात गुरुपौर्णिमेच्या सेवेचा ध्यास होता. मी प.पू. गुरुदेवांना ‘माझी साधना आणि सेवा होऊ दे’, अशी प्रार्थना केली. मी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गुरुपौर्णिमा विशेषांकासाठी विज्ञापने मिळविण्याची सेवा भ्रमणभाषवरून चालू केली. या वेळी मी प.पू. गुरुदेवांची कृपा भरभरून अनुभवली. मला पुष्कळ विज्ञापने मिळाली. ते विज्ञापनदाते दैनिक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक, नातेवाईक आणि हितचिंतक असल्यामुळे मी त्यांना प्रथम व्यष्टी साधनेविषयी माहिती सांगत होतो. प.पू. गुरुदेवांनी मला सतत आनंदी ठेवल्यामुळे मला ही सेवा करता आली.
२ ए . रुग्णालयात ठेवलेला भाव : मी त्या गंभीर स्थितीतही भावाची स्थिती अनुभवली. परिचारिका माझ्या पायावर मलमपट्टी करतांना मी ‘प.पू. गुरुदेव मलमपट्टी करत आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे मला वेदना जाणवत नव्हत्या. परिचारिका औषध देण्यासाठी आल्यावर मी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ येत आहेत’, असा भाव ठेवत असे. मी औषधे घेतांना ‘मी प्रसाद घेत आहे’, असा भाव ठेवला. अशा भावस्थितीमुळे या दुखण्यात मला काहीच त्रास जाणवला नाही.
३. रुग्णालयातून घरी येणे आणि घरी केलेल्या सेवा
३ अ. प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, सनातनचे सद्गुरु, संत अन् साधक घरी भेटायला आल्यामुळे आनंद होणे : ९.७.२०२४ या दिवशी मी रुग्णालयातून घरी आलो. मी घरी आल्यावर मला नामजपादी उपाय परिणामकारक करता येऊ लागले. त्यामुळे या दुखण्यातही मला अधिक आनंद मिळू लागला. मी घरी आल्यावर मला भेटायला सनातनचे सद्गुरु, संत आणि अनेक साधकही येत होते. प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु स्वाती खाडये मला भेटायला आले. त्यामुळे मी याही स्थितीत संपूर्णतः आनंदी होतो.
३ आ. विविध सेवा करणे
१. मला भेटण्यासाठी दायित्व साधक घरी आले होते. त्या वेळी त्यांनी ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या नियोजनाचे दायित्व घेऊ शकता का ?’’, असे मला विचारले. तेव्हा कोणताही विचार न करता मी लगेच त्यांना होकार दिला. माझा गुडघ्याच्या खालील पाय कापल्यामुळे माझे बाहेर जाणे पूर्णतः थांबले होते, तरीही मी घरी राहून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांसाठी विज्ञापने मिळविली.
२. मी मिळवलेल्या गुरुपौर्णिमा स्मरणिकेतील काही विज्ञापनांची रक्कम येणे शेष होते. मी २० कि.मी. अंतरावर असलेल्या कुडाळ येथे रिक्शाने जाऊन वसुलीसाठी प्रयत्न केले. माझ्या मनात ‘माझ्यामुळे वसुली कुठेच शेष राहू नये’, हा एकच विचार होता.
३. माझ्याकडून घरी राहून १०० सनातन पंचांगांचे वितरण झाले.
४. मला ज्ञानशक्ती अभियानाच्या अंतर्गत शाळेत देण्यासाठी ५० लघुग्रंथांसाठी प्रायोजक मिळाले.
४. अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला पहाटे स्वप्नात दर्शन दिले. त्यामुळे मी कृतार्थ झालो.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘एवढ्या मोठ्या दुखण्यात प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून सेवा करून घेऊन मला भावस्थितीत ठेवले आणि आनंद दिला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु स्वाती खाडये, मी एक धुळीचा लहानसा कण आहे. मला तुमच्या चरणांखाली पडून रहाता येऊ दे. तुमचे चरण सतत या कणावर पडून माझ्यातील स्वभावदोष आणि अहं गळून पडू दे. तुम्ही माझ्याकडून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत साधना करून घ्या’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. मंगेश गोपाळ होडावडेकर (आधात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५४ वर्षे) वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. (२३.११.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |