फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये याने गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी केलेले लिखाण

गंगेच्या पाण्याविषयी सध्या अनेक उलटसुलट चर्चा चालू आहेत. ‘कुणी गंगेच्या पाण्यात अनेकांनी स्नान केल्याने आम्ही ते पाणी पिणार नाही’, ‘गंगेचे पाणी खरेच शुद्ध आहे का ?’, असे प्रश्न उपस्थित करून टीका केली जात आहे. गंगेचे स्नानाचे आणि पिण्याचे पाणी यासंबंधी अतीउत्साही दावेही होत आहेत. या.निमित्ताने फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये याने १७ व्या शतकात गंगेचे पाणी पवित्र का आहे ? याविषयीची माहिती दिली आहे, ती येथे दिली आहे.

गंगास्नानविषयीचे एक प्रातिनिधिक छायाचित्र

१. मूर्तीपूजक ब्राह्मण गंगेचे पाणी स्वच्छ भागातून घेऊन ९०० कि.मी.हून लांब विक्रीसाठी नेणे

१७ व्या शतकातील एक फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये गंगेच्या पाण्याविषयी आपल्याला याविषयाशी संबंधित थोडी माहिती देतो. बनारस, म्हणजे काशीविश्वेश्वराच्या मंदिराचे थोडे वर्णन करून ‘मूर्तीपूजकांसाठी गंगेचे पाणी इतके महत्त्वाचे का आहे ?’, हे सांगतांना तो म्हणतो –

‘पण या सर्व गोष्टींपेक्षाही गंगेचे पाणी पिण्याची मूर्तीपूजकांची प्रबळ इच्छा असते; कारण ते प्यायल्यानंतर त्यांची सर्व पापे धुतली जातात, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रतिदिनी हे ब्राह्मण मोठ्या संख्येने गंगेच्या सर्वांत स्वच्छ भागात साधारण बादलीभर पाणी मावेल, अशा लहान तोंडाच्या मातीच्या माठांमध्ये पाणी भरून घेण्यासाठी गेलेले दिसतात. त्यात पाणी भरल्यानंतर हे माठ मुख्य पुरोहिताकडे नेले जातात आणि त्यांची तोंडे अत्यंत तलम अशा भगव्या रंगाच्या ३-४ पदरी कापडाने बांधण्यास तो सांगतो आणि त्यावर त्याची मुद्रा उमटवतो. हे ब्राह्मण, एका चपट्या काठीच्या टोकांना बांधलेल्या ६ छोट्या दोर्‍यांना प्रत्येकी एक माठ टांगून ते नेतात. अनेकदा खांदा पालटून ते थोडी उसंत घेतात आणि कधीकधी हे ओझे घेऊन ते तीन-चारशे लीगचे अंतरही (अनुमाने ९६५ ते १२८५ कि.मी.) पार करतात आणि नंतर ते विकतात किंवा उदारपणे त्यांना बक्षीस देऊ शकेल, अशा श्रीमंत माणसांना ते भेट म्हणून देतात.’

२. माठात भरलेले पाणी प्रदूषित होणार नाही, याची तत्कालीन पद्धतीने काळजी घेण्यात येणे

आधुनिक शास्त्राचे नियम गतकाळाला लावून उपयोग नसतो; पण ‘नदीच्या कुठल्या भागातून पिण्याचे पाणी भरायचे याची जाणीव तत्कालीन समजुतीनुसार तरी लोकांना होती’, हे यातून स्पष्ट होते. यासमवेतच माठात भरलेले पाणी प्रदूषित होणार नाही, याची काळजीही तत्कालीन समजुतीनुसार ते घेत असल्याचे यातून दिसते. हे पाणी घेऊन तीनशे-चारशे लीग, म्हणजे साधारण तितकेच कोस धरले आणि त्याच्या दुप्पट, म्हणजे साधारण ६०० ते ८०० मैल, म्हणजे ९६५ ते १ सहस्र २८५ कि.मी., इतके अंतर हे लोक कापायचे, असे तो सांगतो. यात दुप्पट अतिशयोक्ती आहे, असे जरी धरले, तरी साधारण ५०० ते ६०० कि.मी.ची ही एक प्रकारची कावडयात्राच होते आणि हा १७ व्या शतकातील वाटांवरून केलेला पायी प्रवास आहे !

आजही गंगेचे पाणी खराब न होणे

३. गंगेचे पाणी कधी खराब न होणे वा त्यात अळ्या न होणे यांविषयी ताव्हर्निये याने सांगणे

याच्या पुढे तो हेसुद्धा सांगतो, ‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत; पण गंगेत सतत सोडल्या जाणार्‍या मृतदेहांची संख्या बघता या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवावा, हा मोठा प्रश्न आहे.’ (तत्कालीन काळात काही गैरसमजुतींमुळे गंगेच्या पाण्यात तत्कालीन समाजाकडून मृतदेह सोडले जात असत. ही प्रथा आता बंद करण्यात आली आहे. – संपादक)

गंगेविषयी त्याने आणखी बरीच माहिती दिली आहे; पण आज गंगेच्या पाण्याविषयी श्रद्धाळूंच्या ज्या भावना आहेत आणि इतरांकडून जे प्रश्न विचारले जात आहेत, अगदी तशाच स्वरूपाचे निरीक्षण साधारण ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने नोंदवले आहे, हे फारच आश्चर्यजनक आहे; पण या सगळ्यात गंगेचे पाणी मात्र या विषयाचे देणे घेणे न बाळगता ‘कालातीत’ या शब्दाचा अर्थ आपल्यासमोर उलगडत शतकानुशतके अव्याहतपणे वहात आहे.

– सर्वश्री सत्येन वेलणकर आणि रोहित सहस्रबुद्धे, पुणे. (१३.३.२०२५)