९ मार्च या दिवशी झालेल्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाला हरवून १२ वर्षांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारतीय संघात नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा आहे, तरी संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ कुणा एका खेळाडूवर अवलंबून न रहाता सांघिक कामगिरीच्या बळावर खेळत होता. एक ध्येय आणि त्याच्या निश्चितीच्या जोरावर निःस्वार्थ भावनेने खेळल्यास यश मिळतेच, हे भारतीय संघाने दाखवून दिले. भारतात क्रिकेटप्रेमींची कमतरता नाही. गेल्या ९ महिन्यांत ‘आयसीसी’ने (‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’ने) आयोजित केलेल्या ‘टी-२० विश्वचषक स्पर्धे’च्या विजेतेपदानंतर सलग दुसर्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने भारतीय आनंदात आहेत. खरेतर या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते; परंतु पाक संघ साखळी फेरीतील एकही सामना न जिंकता स्पर्धेबाहेर झाला आणि भारताने स्पर्धेतील सर्व सामने जिंकून विजेतेपद मिळवले, हे भारतियांसाठी अभिमानास्पद आहे ! असो.
येथे तुलना करण्याचा विषय नाही; मात्र क्रिकेटपलीकडे जाऊन विचार केल्यास काळानुसार आज भारताने प्रत्येक क्षेत्रात जिंकणेच आवश्यक आहे. प्राचीन काळात भारत हा ‘विश्वगुरु’ होता. नुकत्याच झालेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातही अनेक पाश्चिमात्त्यांनी भारताच्या विश्वगुरुपदाचे महत्त्व अधोरेखित केले. संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, विज्ञान आणि तंज्ञत्रान क्षेत्रातील प्रगती, सुधारणारी अर्थव्यवस्था आणि वाढता विकासदर यांमुळे जागतिक स्तरावर भारत आघाडीवर येत आहे. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे अन्य राष्ट्रांमध्येही भारताचे महत्त्व अधोरेखित होते. भारताला प्राचीन आणि अमूल्य असा आध्यात्मिक वारसा लाभल्यामुळे, तसेच पुरातन मंदिरे, साधू-संत यांमुळे भारताचे आध्यात्मिक बळही अधिक आहे. अनेक पाश्चात्त्य देश आजही भारताकडे दिशादर्शक म्हणून पहातात. सामाजिक, आर्थिक सर्वच स्तरांवर भारताचे महत्त्व वाढत असले, तरी काही समाजद्रोही, राष्ट्रद्रोही, हिंदुद्रोही यांमुळे भारताच्या विकासाला आडकाठी निर्माण करण्यासमवेत भारतियांमध्ये अस्थिरता वाढवण्याचे काम वेगवेगळ्या षड्यंत्रांद्वारे करत असतात. त्यासाठी विदेशातूनही संबंधितांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. जातीयवाद, भ्रष्टाचार, आतंकवाद, नक्षलवाद, साम्यवाद, धर्मांतर, धर्मांधांची आक्रमणे यांमुळे समाजातील वातावरण कलुषित होते. मतभेद आणि फितुरी यांमुळे भारताची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे भारताला पुन्हा विश्वगुरुपदावर आरूढ करण्यासाठी प्रत्येक भारतियाने राष्ट्राला प्राधान्य देऊन निःस्वार्थ भावनेने त्यांचे योगदान देणे आवश्यक आहे !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.