महाराष्ट्रातील बसस्थानकांची विदारक स्थिती दाखवून प्रशासनाला जागे केले !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकारिता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला. शोध पत्रकारितेद्वारे ‘सनातन प्रभात’ने भ्रष्टाचार उघड केला. ‘सनातन प्रभात’मधील सत्य आणि वस्तूनिष्ठ वृत्तांकनामुळे अपप्रवृत्तींना प्रतिबंध बसला. या वृत्तांकनाचे उमटलेले पडसाद दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या या विशेष लेखमालेद्वारे दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (‘एम्.एस्.आर्.टी.’चे) महामंडळ हे सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन समजले जाते. वर्ष २०२३ एस्.टी.महामंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे एस्.टी. महामंडळाने बसस्थानके स्वच्छ करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात मात्र त्यावर प्रामाणिकपणे कार्यवाही होतच नव्हती. ७५ वर्षांनंतरची एस्.टी. महामंडळाची ही स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी मार्च २०२३ मध्ये एस्.टी. महामंडळाच्या बसस्थानक स्वच्छता मोहिमेचे खरे स्वरूप उघड करणारी वृत्तमालिका दैनिक ‘सनातन प्रभात’ने चालू केली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील बसस्थानकांवर जाऊन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी बसस्थानकांची पहाणी केली. प्रवाशांशी संवाद साधला. त्यानंतर एकीकडे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या एस्.टी. महामंडळाच्या अधिकार्‍यांची स्वच्छतेविषयीची असंवेदनशील आणि अठराविश्व दारिद्र्याप्रमाणे बसस्थानकांचा भकासपणा ‘सनातन प्रभात’ने उघड केला. राज्यातील १८ बसस्थानकांची दु:स्थिती दाखवणारी वृत्तमाला ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केली.

श्री. प्रीतम नाचणकर

१. एस्.टी.महामंडळाच्या स्वच्छता अभियानाचा बोगसपणा उघड केला !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी. महामंडळाने वर्ष २०२२ मध्ये बसस्थानकांची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या; मात्र काही महिने होऊनही त्यावर कार्यवाही होत नव्हती. त्यानंतर ‘सनातन प्रभात’ने या अभियानाचा बोगसपणा उघड करण्यासाठी मोहीम राबवली. तुटलेली बाकडी, पिण्याच्या पाण्याची असुविधा, कचराकुंड्या नसणे, तंबाखूच्या पिचकार्‍यांनी रंगलेल्या भिंती, उघड्यावर टाकलेला कचरा, जळमटांनी माखलेले पंखे, खड्डेमय परिसर, तुंबलेल्या मुतार्‍या, कुत्र्यांचा मोकाट वावर, उघड्यावर सोडलेले मुतार्‍यांतील मूत्र, पिण्याच्या पाण्याचे तुटलेले नळ, मोडकळीला आलेल्या इमारती, उपाहारगृहे आणि चालक-वाहक निवारा खोल्यांची दुरवस्था, खासगी वाहतुकीचा उघडपणे वावर, मद्यपींचा अड्डा अशी असलेली एस्.टी.च्या बसस्थानकांची विदारक स्थिती उघड केली. ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताची नोंद घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाने १० एप्रिल २०२३ या दिवशी एस्.टी. महामंडळाचे तत्कालीन संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ते निवेदनासह सादर केली. यावर शेखर चन्ने यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले.

२. ‘स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’ची घोषणा !

‘सनातन प्रभात’मधील वृत्तमालिकेनंतर १ मे २०२३ या दिवशी एस्.टी. महामंडळाने ‘स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’ची घोषणा केली. या अंतर्गत बसस्थानकांची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी, सजावट, प्रसाधनगृहाची स्वच्छता, कचरा कुंड्यांची व्यवस्था, गाड्यांची स्वच्छता ही कामे करण्यात आली आहेत. सध्या या अभियानाच्या अंतर्गत कार्यवाही चालू आहे.

महामंडळाने बसस्थानकांच्या स्वच्छतेचे अभियान घोषित केले असले, तरी त्यावर कार्यवाही होत आहे कि नाही ? याविषयीही दैनिक ‘सनातन प्रभात’ लक्ष ठेवून आहे.

– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (१६.३.२०२५)