‘कदंबा’ महामंडळ काही उपाययोजना करणार का ?

स्वारगेट, पुणे येथील बसस्थानकातील वाहनतळात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर घडलेल्या अतीप्रसंगाने जनसामान्यांना हादरवून सोडले. या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न केवळ पुण्यातील स्वारगेट बसस्थानकापर्यंत मर्यादित नाही, तर त्याची व्यापकता संपूर्ण देशातील सर्व बसस्थानकांपर्यंत पसरलेली आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील कदंबा परिवहन महामंडळाच्या सर्वच बसस्थानकांसाठीही हा चिंतेचा विषय आहे. विशेष करून पणजी, मडगाव यांसारख्या मोठ्या बस आगारांना तर पुष्कळ काळजी करायला लावणारा विषय आहे. सध्या गोव्यात पणजी – म्हापसा, कळंगुट मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणींची ये-जा वाढली आहे. त्यातच पणजी बसस्थानक, पर्वरी भागात रात्रभर चालणार्‍या खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि टपर्‍या यांमुळे त्यात पुष्कळ वाढ झाली आहे. त्या ठिकाणी खाद्यपदार्थांसह तंबाखूजन्य धुम्रपानाच्या वस्तू, तसेच सौम्य उत्तेजक पेय सहज उपलब्ध होतात.

त्यामुळे पणजी येथील कदंब बसस्थानकाच्या आवारातील एका भागात पुष्कळ वर्दळ, तर वाहनतळाच्या भागात पूर्ण शुकशुकाट असतो, तसेच बसस्थानकाच्या परिसरात प्रकाश व्यवस्था अपुरी असल्यामुळे बरीच तरुण जोडपी अंधाराचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न करतात. काही जोडपी अंधारात अश्लील चाळे करतांना सहज आढळतात, असे प्रत्यक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले आहे. पणजी बसस्थानक परिसरात सुरक्षारक्षक कधीतरीच दृष्टीस पडतात. या परिसरात अनेक अनैतिक व्यवसाय करणार्‍यांचा वावरसुद्धा आढळतो. काही वेळा एक किंवा दोन तरुणींसह काही तरुणांचे टोळके निर्जन असलेल्या वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनांच्या दिशेने जातांना आढळून आले आहे.

वर्तमानात घडणार्‍या महिलांवरील अतीप्रसंगांवरून समाजातील नैतिकता पुष्कळच खालच्या स्तरावर पोचली आहे. धर्मशिक्षण आणि नैतिकतेचा अभाव, तसेच मोठ्या प्रमाणात बोकाळलेला भोगवाद यांमुळे स्वारगेट बसस्थानक परिसरात घडलेला प्रसंग आज ना उद्या गोव्यातसुद्धा घडू शकतो, याचा कदंबा परिवहन महामंडळाने विचार करणे आवश्यक आहे. कदंबा परिवहन महामंडळाने सर्वच बसस्थानक, बस आगार यांमध्ये सुरक्षाव्यवस्था चोख करणे आवश्यक आहे, तसेच बसस्थानक परिसरात चालणार्‍या अवैध हालचाली आणि व्यवसाय यांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे, असे प्रकर्षाने वाटते.

– श्री. रवींद्र बनसोड, फोंडा, गोवा.