साप्ताहिक कन्नड ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाचा अंक हातात घेतल्यावर पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८८ वर्षे) यांना आलेली अनुभूती आणि त्यांच्या मनात त्या सेवेसंदर्भातील स्मृतींना मिळालेला उजाळा !

मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साप्ताहिक कन्नड ‘सनातन प्रभात’विषयी त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. (श्रीमती) राधा प्रभु यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (श्रीमती) राधा प्रभु

१. कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिनाच्या अंकातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सुंदर छायाचित्राकडे पाहिल्यावर प्रकाश दिसणे

‘२१.१.२०२५ या दिवशी मला कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा २६ व्या वर्धापनदिनाचा अंक मिळाला. त्या अंकाच्या पहिल्या पानावर असलेल्या प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) सुंदर छायाचित्राकडे पाहिल्यावर मला प्रचंड प्रकाश दिसला. ‘त्या छायाचित्राजवळ सात्त्विक वस्त्र परिधान केलेला एक साधक भक्तीभावाने हात जोडून उभा आहे’, असे मला दिसले. तेव्हा मला वाटले, ‘हा अंक किती पवित्र आहे ! त्याची लगेचच आरती करावी.’ मी तो अंक देवघरात ठेवून त्याची आरती केली. माझा नातू श्री. भरत प्रभु आणि त्याची पत्नी सौ. भवानी प्रभु हे माझ्या समवेत उभे राहून हात जोडून आरती बघत होते.

२. मनात पूर्वी कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित केलेल्या सेवेच्या संदर्भातील स्मृती जाग्या होणे

२ अ. दिवसभर ‘सनातन प्रभात’चे वितरण करूनही थकवा न येता उत्साह जाणवणे आणि समाजातील व्यक्तींकडून कौतुक होणे : काही वर्षांपूर्वी मला ‘सनातन प्रभात’शी निगडित सेवेचे भाग्य लाभले होते. आम्ही ५० ते ६० या वयोगटातील महिला एकत्र येऊन उन्हात आणि पावसात घरोघरी जाऊन ‘सनातन प्रभात’ नियतकालिक उत्साहाने वितरित करत असू. आरंभी ४ पानी नियतकालिक होते आणि सध्या १६ पानी नियतकालिक आहे. त्या वेळी आम्ही दुपारी १२ वाजेपर्यंत स्वयंपाक आटोपून धर्मप्रचार करण्यासाठी निघत होतो आणि संध्याकाळी ७ वाजता घरी येत होतो. गुरुकृपेने आम्हाला थकवा जाणवत नसे आणि अडचण येत नसे. उलट आम्हाला उत्साह जाणवून आनंदाची अनुभूती येत असे आणि सन्मान प्राप्त होत असे. आमचे समाजातील व्यक्तींकडून होणारे कौतुक आम्ही गुरुचरणी अर्पण करत असू. आमचे बोलणे ऐकून समाजातील काही पुरुष, महिला आणि युवक स्वतःच्या असमर्थतेविषयी खंत व्यक्त करत असत.

२ आ. सेवेत व्यापकता येऊन अनेक अनुभूती येणे : आम्ही प्रतिदिन प्रार्थना करत होतो, ‘गुरुदेवा, आम्हाला वितरणासाठी नवीन कल्पना सुचवा आणि ही सेवा आमच्याकडून करून घ्या.’’ आम्ही हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषांतील ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचेही वर्गणीदार करत होतो. आमच्या या वितरणसेवेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत गेला आणि आम्हाला अनेक अनुभूती येऊ लागल्या.

३. समाजातील काही जणांना साधकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

काही जणांना स्वप्नात किंवा एखाद्या संन्याशाच्या माध्यमातून साधकांच्या संदर्भात समजत असे.

अ. ‘आज घरी दोन महिला येणार आहेत. त्यांचे म्हणणे ऐका आणि तसे करा. तुम्हाला लाभ होईल.

आ. आज घरात दोन लोक येतील. ते जे सांगतील, त्याप्रमाणे तुम्ही करा.

इ. आज तुमच्याकडून आध्यात्मिक कार्य होणार आहे.’

गुरुदेवा, आपण माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतल्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘मला सेवा करण्यासाठी शक्ती द्या’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते.’

– (पू.) श्रीमती राधा प्रभु, मंगळुरू (सनातनच्या ४४ व्या संत, वय ८८ वर्षे) (२३.१.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक