जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजनिमित्त देहूतील मंदिरात सर्वांत मोठ्या पगडीचे लोकार्पण !

अर्पण करण्यात आलेली पगडी

देहू (जिल्हा पुणे) – ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज’निमित्त ५ फूट उंच आणि ३० फुटांचा घेर असलेली पगडी दिलीप सोनिगरा यांनी तुकोबाचरणी अर्पण केली आहे. ही जगातील सर्वांत मोठी पगडी असल्याचा दावा केला जात आहे. याची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया’ आणि ‘जीनियस बुक’ने घेतली आहे. देहू देवस्थानाकडूनही या भल्या मोठ्या पगडीचे कौतुक करण्यात आले. ही पगडी पहाण्यासाठी तुकोबांच्या मुख्य मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. या पगडीचे भाविकांच्या उपस्थितीत ११ मार्चला अनावरण करण्यात आले.

या वेळी ‘श्री संत तुकाराम महाराज देवस्थाना’चे प्रमुख विश्वस्त अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या समवेत ‘श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती’चे अध्यक्ष श्री. प्रकाश काळे आणि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते ‘श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती’चे अध्यक्ष श्री. प्रकाश काळे यांचा सत्कार करण्यात आला.