‘आम्ही भारतीय’ मंचाची प्रशासनाकडे मागणी
सिंधुदुर्ग – मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनी राज्यघटनेशी एकनिष्ठ रहाण्याची अन् राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेतलेली असतांना अल्पसंख्यांक समुदायाविषयी आक्षेपार्ह आणि राज्यघटनेतील प्रावधानांच्या विरोधात विधाने प्रसिद्ध होत असल्याने जिल्ह्यातील वातावरण संवेदनशील बनले आहे. (मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे चहाच्या विषयावरून एका हिंदु पर्यटकाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्या वेळी ‘आम्ही भारतीय’वाले कुठे होते ? अल्पसंख्यांकांचा पुळका येणारे हे लोक त्या वेळी ज्यांना मारहाण झाली, त्यांच्या बाजूने उभे राहिले होते का ? मालवण येथे भंगार व्यावसायिक असलेल्या एका परप्रांतीय मुसलमानाने भारतविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली होती. त्या वेळी ‘आम्ही भारतीय’वाले त्यांचे प्रबोधन करण्यासाठी गेले होते का ? कि या घटनांनंतर हिंदूंच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यावर ‘आम्ही भारतीय’ची स्थापना झाली, असे समजायचे ? – संपादक) अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावनाही निर्माण होत आहे. राष्ट्रीय पुरुषांची अवहेलना काही व्यक्तींकडून होत असल्याने जातीय तेढही निर्माण होत असून अशा व्यक्तींवर योग्य ती कारवाई व्हावी, तसेच विद्वेषी (hate speech) भाषणे करणार्या व्यक्तींवर गुन्हे नोंद करून धार्मिक सलोखा कायम ठेवावा. जिल्ह्यात शांतता समिती, मोहल्ला समिती स्थापन कराव्यात, असे आवाहन जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येत ‘आम्ही भारतीय’ या व्यासपिठाद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केले आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. (मालवण येथील मुसलमान भंगार व्यावसायिकाने भारतविरोधी घोषणा दिल्याचे समजल्यावर ‘आम्ही भारतीय’वाल्यांनी ‘विद्वेषी भाषण’ केले; म्हणून त्याच्यावर कारवाई होण्यासाठी पुढाकार घेतला होता का ? – संपादक)
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून शांत, संयमी आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून परिचित आहे; मात्र या लौकिकास बाधा येणार्या घटना जिल्ह्यात वाढत असून धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा वेळी जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून जिल्ह्यात धार्मिक आणि जातीय सलोखा कायम ठेवावा अन् अशा प्रवृत्तींवर योग्य ती कारवाई करावी; मात्र हे करत असतांना निरपराध्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि सर्वसामान्य त्यात भरडला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
‘जिल्ह्यातील कायदा आणि व्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेऊन लवकरच शांतता समितीची पुनर्रचना करू’, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले.
या वेळी झालेल्या चर्चेत अधिवक्ता देवदत्त परुळेकर, कमलताई परुळेकर, अधिवक्ता संदीप निंबाळकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, सतीश लळीत यांच्यासह अन्य उपस्थित होते.
संपादकीय भूमिका‘आम्ही भारतीय’वाल्यांना केवळ अल्पसंख्यांकांचाच पुळका का येतो ? हिंदु राष्ट्रपुरुष आणि हिंदु समुदाय यांच्या विरोधात विधाने होतात, त्याचे त्यांना काहीच का वाटत नाही ? ‘आम्ही भारतीय’ म्हणवणारे अल्पसंख्यांक आहेत का ? |