|

पुणे – येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात बीएम्डब्ल्यू चारचाकी थांबवून मद्यधुंद अवस्थेतील गौरव आहुजा या तरुणाने लघुशंका केल्याचे प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून आले. तेथे उपस्थित महिलांनी विरोध केल्यावरही त्याने उद्दामपणा केला. रस्त्यावरच महिलांसमोर अश्लील चाळे केले. त्याच्या समवेतचा दुसरा तरुण गाडीत बसला असून त्याच्या हातातही मद्याची बाटली आहे. उपस्थितांनी त्यांना खडसवल्यावर ते भरधाव वेगात वाघोलीच्या दिशेने निघून गेले. पुणे पोलिसांनी गाडीचे मालक मनोज आहुजा यांना कह्यात घेतले. ते लघुशंका करणार्या गौरवचे वडील आहेत. गौरव आहुजा याला पोलिसांनी पकडले असून त्याने केलेल्या कृत्याची क्षमा मागितली आहे. त्याचा मित्र भाग्येश नीबजीया यालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
यावर विधान परिषद उपसभापती डॉ. गोर्हे यांनी खेद व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘अशा घटनांवर आळा घालण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी’, अशी सूचना दिली.
तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते ! – मनोज आहुजा (गौरव यांचे वडील)
वडील मनोज आहुजा म्हणाले, ‘‘गौरव माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते. त्याने रस्त्यावर नव्हे, तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. घटनेत वापरलेली गाडी माझ्या नावावर आहे. या प्रकरणी जी कारवाई होईल, ती मला मान्य आहे.’’ मनोज आहुजा यांचा पुण्यात एक बार असल्याची माहिती आहे. एका माहितीनुसार गौरव आणि मनोज आहुजा यांच्यावर क्रिकेट सामन्यांवर बेटींग (सट्टा) लावत असल्याच्या आरोपाप्रकरणी वर्ष २०२१ मध्ये गुन्हा नोंदवला होता. यामध्ये त्यांनी महाविद्यालयीन तरुणांना अडकवले होते.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.’’