देवीने महिषासुराला मारले, तो महिला दिवस नाही का ?

माझ्या पुतणीने मला तिच्या शाळेत ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने मदर तेरेसा यांची माहिती सांगण्याविषयी सांगितले होते. त्या वेळी मी तिला ‘भारतरत्न लता मंगेशकर’ यांच्याविषयी माहिती सांगण्यास सांगितली. तिच्या शिक्षिकेने हो – नाही करत शेवटी तो विषय सादर करण्यास अनुमती दिली. मी तिला आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा करतात ? हे तुला माहिती आहे का ? ती म्हणाली, ‘नाही.’

१. एकीकडे महिला दिन साजरा होणे आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार हा विरोधाभास !

मग मी तिला वर्ष १९०८ मध्ये महिलांनी आंदोलन का केले ?, वर्ष १९०९ मध्ये ‘अमेरिकन सोशलिस्ट पार्टी’ने आंदोलन कसे केले, क्लारा जेटकिन यांनी त्याला आंतरराष्ट्रीय कसे केले ? का केले ? वर्ष १९११ पासून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा कसा होतो ? वर्ष १९७५ पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ केला. हा सर्व इतिहास सांगितला. अमेरिका, जर्मनी, रशिया, ब्रिटन या देशांना महिला दिवस साजरा करण्याची आवश्यकता का पडली ?, हेही सांगितले. महत्त्वाचे म्हणजे वर्ष १९१९ मध्ये (म्हणजे महिला दिवस साजरा व्हायला लागून ९ वर्षे उलटल्यानंतर) आपल्या देशात जालियनवाला बाग हत्याकांडात कितीतरी महिलांना जीव गमवावा लागला, ब्रिटिशांनी किती तरी महिलांवर अत्याचार केले. आपल्या देशात महिलांवर बेछूट अत्याचार करणारे हे लोक त्यांच्या देशात मात्र महिला दिवस साजरा करत होते. वर्ष १९१७ मध्ये रशियात महिलांनी अन्न आणि शांतता यांसाठी ४ दिवसांचे आंदोलन केले. त्या ४ दिवसांच्या आंदोलनामुळे त्या वेळच्या रशियन झारला पायउतार व्हावे लागले आणि त्यानंतर रशियन सरकारने महिलांना मतदानाचा अधिकारही दिला. ज्यांनी झाशीच्या राणीवर तलवार उगारली, तेच देश महिला दिवस साजरा करण्याचा प्रारंभ करतात आणि त्याला आंतरराष्ट्रीय रूप कसे देतात, हा विरोधाभास दिसून येतो.

ज्यांनी आपल्या देशातील आंदोलने माणसांना गोळ्या घालून आणि फाशी देऊन चिरडली, त्यांनी त्यांच्या देशातील महिलांच्या आंदोलनाचा सन्मान केला अन् वरून त्याला ‘आंतरराष्ट्रीय’ केले, या प्रकाराला काय म्हणावे ? महिलांना जगभर प्रचलित असणारी सामाजिक माध्यमे वापरू न देणारा ‘चीन’ महिला दिवस किती आनंदाने साजरा करतो ?

२. आपल्या महिलांनी सोसले अत्याचार, त्यांचे बलीदान हे सर्व विसरणे म्हणजे कृतघ्नपणा नव्हे का ?

देवीने महिषासुराला मारले, तो महिला दिवस नाही का ? श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले, तो दिवस महिला दिवस नाही का ? प्रीतीलता वडेद्दार, कल्पना दत्त, लक्ष्मी सहगल, भोगेश्वरी फुकनानी, बेगम हजरत अली, मातंगिनी हाजरा, कनकलता बरूआ यांनी देशासाठी स्वतःचे प्राण दिले, तो महिला दिवस नाही का ? भिकाजी कामा यांच्या कार्याकरता आपण महिला दिवस साजरा करू शकत नाही का ? आपण यांची केवळ आठवण ठेवून उपयोग नाही, यांचे उपकार न फिटण्यासारखे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई, बाबाराव सावरकर यांच्या पत्नी यशोदाबाई आणि नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई यांना किती यातना भोगाव्या लागल्या, महिला दिवस साजरा करण्यात पुढाकार घेणार्‍या ब्रिटिशांनीच त्यांचा किती छळ केला, त्यांची दयनीय अवस्था कशी झाली, हे सगळे विसरणे म्हणजे कृतघ्नपणाच आहे.

३. आपण आपल्या गौरवगाथेविषयीचा अभिमान बाळगून तो सांगायला हवा !

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘भारत छोडो’ आंदोलनात ब्रिटिशांची गोळी लागून कनकलता बरूआ यांचा मृत्यू झाला; पण त्यांना आपण सगळेच विसरून गेलो. २१ व्या शतकात वयाच्या १७ व्या वर्षीच अंगावर गोळी झेलणार्‍या मुलीला ‘नोबेल शांतता पुरस्कार’ घोषित झाला…! आपणच आपल्या देशासाठी लढलेल्या सुकन्येला सन्मान देऊ शकलो नाही. त्यांचे छायाचित्रच काय; पण नावही कुठल्या शाळेतून घेतले जात नाही, पुरस्कार तर लांबच राहिला ! २० व्या शतकाच्या प्रारंभीला १५ सहस्र महिलांनी आंदोलन केले, तर ती एक कृती आज आंतरराष्ट्रीय रूप घेऊन जगभर साजरी केली जाते; पण आपल्या देशातल्या माणसांची, त्यांच्या अशा कर्तृत्वाची देशाच्या संसदेत राष्ट्रीय नेत्यांकडून चेष्टा होते, निंदानालस्ती होते आणि सगळे जग ते पहाते. आपल्याला आपल्या गौरवगाथेविषयी अभिमान का नाही ? कारण आपल्याला हे काही माहितीच नाही, कुणी सांगत नाही, कुणी बोलत नाही. ज्यांनी मुलामुलींना या कथा सांगितल्या पाहिजेत, त्यांनाच त्या ठाऊक नाहीत आणि माहिती करून घेण्याची इच्छाही नाही. हेच मोठे दुर्दैव आहे.

जगाला या सर्वांचा परिचय करून देण्यात आपण न्यून पडलो आहोत, हे नक्की; पण आता सुधारले पाहिजे. चूक दुरुस्त केली पाहिजे. कर्तृत्वाचा सन्मान करायचा, तर प्रत्येकाचाच झाला पाहिजे. कर्तृत्वाची प्रेरणा प्रत्येकातच आहे. तिचे कौतुक करता आले नाही, तरी चालेल; पण त्या कर्तृत्वाविषयी आदर बाळगलाच पाहिजे.

– श्री. मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, ‘आस्था काऊन्सिलिंग सेंटर’, पुणे.