शाळेत नव्याने सेवारत झालेल्या मद्यपी शिक्षकाच्या कृत्याने पालकांसह ग्रामस्थ संतप्त
सावंतवाडी – तालुक्यातील तांबुळी येथील पूर्ण प्राथमिक शाळेत ८ दिवसांपूर्वी सेवारत झालेल्या एका शिक्षकाने मद्याच्या नशेत प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या एकूण ९ विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण केल्याचे समजल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या शिक्षकाच्या विरोधात बांदा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.
शिक्षकाने मारहाण केल्याचे मुलांनी जेव्हा घरी सांगितले, तेव्हा पालक आक्रमक झाले आणि त्यांनी गटशिक्षणाधिकारी, तसेच संबंधित अधिकारी यांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकाच्या विरोधात बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ‘माझे कुणीही काहीही करू शकत नाही’, असे तो शिक्षक बोलत होता, असे पालकांनी सांगितले.
या वेळी भाजप तालुका क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, तांबुळी सरपंच वेदिका नाईक, उपसरपंच जगदीश सावंत, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलाकर सावंत, सदस्य यशवंत सावंत, मुख्याध्यापक भरत बांदेकर, विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत ठाकूर, तसेच पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.