सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेले गुणमोती !

‘देवाला मुंगीच्या पायातील घुंगरांचा आवाजही ऐकू येतो’, असे म्हणतात. त्याप्रमाणेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधकांच्या मनातील प्रत्येक विचाराकडे लक्ष असते. ते साधकाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे याची जाणीव करून देतात. खरेतर ते प्रत्येक साधकासमवेत सूक्ष्मातून असतातच; मात्र माझ्यामधील स्वभावदोष आणि अहं यांच्यामुळे ‘ते सतत समवेत आहेत’, याची अनुभूती घ्यायला मी अल्प पडतो. मी स्थुलातून त्यांच्या समवेत असलेल्या सोनेरी क्षणांच्या कालावधीत त्यांनी मला कधी प्रत्यक्ष शिकवले, तर कधी अप्रत्यक्षरित्या शिकवले. त्यापैकी काही गुणमोती पुढे दिले आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. स्वतःच्या नावाचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेण्याचे महत्त्व 

वर्ष २००७ मध्ये एकदा गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला माझ्या ‘रोहित’ नावाचा अर्थ विचारला. तेव्हा मी त्यांना ‘पक्षी’ असे सांगितले; कारण आतापर्यंत मला ‘रोहित’ म्हणजे ‘पक्षी’ असेच ठाऊक होते. त्यानंतर काही मासांनी त्यांनी मला पुन्हा माझ्या नावाचा अर्थ विचारला. तेव्हा मी विविध ठिकाणी शोधल्यावर मला ‘रोहित’ नावाचा मासा आहे’, असे समजले. नंतर पुन्हा एक वर्षाने त्यांनी त्यांच्या समवेत धारिका पडताळायला बसणार्‍या साधकाला ‘रोहित’ नावाचा अर्थ काय ?’,  असे मला विचारायला सांगितले. तेव्हा ‘गुरुदेव ३ वेळा विचारत आहेत, म्हणजे आणखी काहीतरी वेगळा अर्थ असणार’, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा बर्‍याच जणांना विचारल्यानंतर एका पुरोहितांकडून मला ‘सूर्याचे एक नाव रोहित आहे’, असे समजले. मी हा अर्थ गुरुदेवांना सांगितल्यानंतर त्यांनी मला पुन्हा याविषयी कधीही विचारले नाही. मला किंवा माझ्या कुटुंबियांनाही माझ्या नावाचा खरा अर्थ ठाऊक नव्हता. केवळ गुरुदेवांमुळेच मला माझ्या नावाचा अर्थ समजला. ‘आपण सर्वार्थांनी देवाशी जोडलेलो असतो’, हेही त्यांनी मला शिकवले.

२. ‘कुणाविषयी निष्कर्ष काढून त्यांच्याविषयी अनुचित ग्रह करून घेऊ नये आणि प्रत्येक साधकातील गुण पहाण्याचा अन् त्यातून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा’, हे लक्षात येणे 

श्री. रोहित साळुंके

वर्ष २००९ मध्ये एका साधिकेने अन्य एका साधिकेविषयी लेख लिहिला होता. तो लेख वाचल्यानंतर माझ्या मनात ‘साधिकेने या लेखात त्या साधिकेविषयी लिहितांना त्यात स्वतःचेच कौतुक अधिक केले आहे’, असा विचार आला. नंतर काही वेळाने ती साधिका मला भेटली. तेव्हा तिला पाहून माझ्या मनात पुन्हा तोच विचार आला. मी तिला तिच्या लेखाविषयी काहीच सांगितले नाही. त्याच दिवशी सायंकाळी माझी गुरुदेवांशी आकस्मिक भेट झाली. तेव्हा त्यांनी मला प्रथम विचारले, ‘‘त्या साधिकेचा लेख वाचला का ?’’ मी काही बोलणार तेवढ्यात ते म्हणाले, ‘‘तिने किती सुंदर लिहिले आहे ना. तिला तसे सांगितले का ?’’ त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर मला माझीच लाज वाटली. तेव्हा ‘गुरुदेव साधकांच्या मनातील प्रत्येक विचार जाणतात. आपण कुणाविषयीही निष्कर्ष काढून त्याविषयी ग्रह करून घेऊ नये. त्याऐवजी त्यातील चांगलेच पहाण्याचा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा’, हे त्यांनी मला शिकवले.

३. गुरुदेवांना अपेक्षित अशी कृती करण्याचा सतत विचार करायला हवा 

मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना मला माझ्यामधील स्वभावदोष आणि अहंचे पैलू फळ्यावर लिहायचे होते. हे पैलू लिहितांना माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होत होता. दुसर्‍या दिवशी मी आश्रमात येतांना माझे स्वभावदोष लिहून आणले होते आणि मला ते फळ्यावर लिहायचे होते; मात्र त्याच दिवशी आमच्या जिल्ह्यातील काही साधक आश्रम पहायला आले होते. तेव्हा माझ्या मनात ‘ते माझ्याबद्दल काय विचार करतील’, असा प्रतिमेचा विचार मनात येऊन मी ते स्वभावदोष आणि अहंचे पैलू फळ्यावर लिहिले नाहीत. मला रात्री सारणी लिखाण करतांना हा प्रसंग आठवला. तेव्हा मला वाटले, ‘खरेतर मी ‘गुरुदेवांना काय अपेक्षित आहे’, असा विचार करायला हवा होता. त्याऐवजी  मी ‘अन्य काय विचार करतील’, असा माझी प्रतिमा जोपासणारा अयोग्य विचार केला.’ या विचारांची मला खंत वाटली.

४. ‘प्रतिमा आणि अहंकार नष्ट करण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्यानंतर देव भेटतोच’, याची आलेली प्रचीती 

‘स्वतःच्या चुका सर्व साधकांच्या समोर सांगणे’, हा स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या प्रक्रियेचा एक भाग असतो. मला सर्वांसमोर चुका सांगायच्या होत्या. तेव्हा पहिल्या दिवशी प्रतिमेमुळे माझा पुष्कळ संघर्ष झाला. दुसर्‍या दिवशी दिवसभर ‘मला सर्वांसमोर चूक सांगायची आहे’, हे मी मनावर बिंबवत होतो आणि त्यासंदर्भात स्वयंसूचनाही घेत होतो. दुसर्‍या दिवशी सायंकाळी मी सर्वांसमोर माझ्या चुका सांगून क्षमायाचना केली. त्यानंतर मला पुष्कळ हलके वाटले. नंतर काही वेळाने मी भोजनकक्षाबाहेर गेलो असतांना मला दिसले, ‘गुरुदेव खिडकीमधून मला पहात आहेत.’ मी क्षणभर तेथेच स्तब्ध झालो. त्यांनी मला पाहून हात हलवला आणि ते अत्यंत सुमधुर हसले. तेव्हा मी भानावर आलो.

पूर्वी ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना देवदर्शन होत असे. आजच्या काळात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न करणे’, हीच खरी तपश्चर्या आहे. ‘आपण प्रतिमा आणि अहंकार नष्ट करण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्यानंतर देव भेटतोच’, याची अनुभूती गुरुदेवांनी मला दिली.

हे गुरुदेवा, तुम्ही मला विविध प्रसंग आणि माध्यमे यांद्वारे अखंड शिकवत आहात. ‘तुम्ही मला अखंड शिकण्याच्या स्थितीत ठेवा आणि तुम्हाला अपेक्षित असे मला ग्रहण करता येऊ दे’, अशी मी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना करतो.’

– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (५.१०.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील
म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.