वृत्तसंकेतस्थळावर मनोरंजनाच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या वृत्तांना काहीसे अधिक महत्त्व दिले जाते. त्यात जेवढी अश्लीलता अधिक असेल, तेवढी ती वृत्ते अधिक वाचली जातात. अभिनेत्यांच्या खासगी आयुष्यावरील वृत्ते चवीने चघळली जातात. पूर्वी यांसाठी काही विशिष्ट मासिके होती. जसे इंग्रजीतील ‘स्टार डस्ट’ ! त्यातील हिंदी चित्रपटसृष्टीतील वलयांकित अभिनेते-अभिनेत्री यांची विवाहबाह्य प्रकरणे, प्रेमप्रकरणे, त्यांची छायाचित्रे, त्यांच्याविषयीच्या एकमेकांनी केलेल्या चहाड्या (गॉसिप्स) अगदी आवडीने वाचली जात. ८० च्या दशकात मराठीतही मोठ्या प्रमाणात अशी साप्ताहिके निघाली. आता संकेतस्थळांचा काळ आहे. आता या मासिकांची जागा वृत्तसंकेतस्थळांवरील उजव्या बाजूला असलेल्या जागेने घेतली आहे.
पूर्वी काही मोजक्या वाहिन्या होत्या. आता मनोरंजनाच्या इतक्या वाहिन्या झाल्या आहेत की, त्याला गणती नाही. माध्यमे वाढल्याने कलाकारांची संख्याही वाढत आहे. मालिका, चित्रपट, विज्ञापने आदींमध्ये काम केल्याने पैसा आणि प्रसिद्धी मिळत असल्याने ते एक वलयांकित ‘करिअर’ झाले आहे. भारतभरातील अनेक गावांतील मुले-मुली मुंबईसारख्या शहरात यासाठी येत असतात. सांगायचे सूत्र म्हणजे त्यामुळे कलाकारांची संख्याही भारंभार झाली आहे. या प्रत्येक कलाकाराच्या खासगी आयुष्यात काय घडते ?, हे पहाण्यात खरेतर कुणाला रस आहे ? पण या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांतून ‘हे वाचकांवर एक प्रकारे आदळतच आहे’, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. कुणी म्हणेल, ‘ते पहाण्याचे कुणावरही बंधन नाही.’ हे खरे आहे; परंतु समाज एवढा संयमी नसतो. समाजाने हे भान ठेवले पाहिजे की, आपला अमूल्य वेळ इतरांच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे पहाण्यात का फुकट घालवावा ? अभिनेत्री, अभिनेत्यांना त्याचे पैसे मिळतात, समाजाचा मात्र केवळ त्यांना पहाण्यात वेळ वाया जातो.
एखाद्या कलेचा रसिकतेने आस्वाद घेणे हे समजू शकतो. छायाचित्र काढणे हीसुद्धा एक कला आहे; परंतु अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे प्रसिद्ध करून तो एक नेहमीचा धंदा बनवणे आणि समाजाला त्यात गुंतवून ठेवणे, यातून काय मिळणार आहे ? छायाचित्रकार, माध्यमे आणि कलाकार त्या अनुषंगाने येणारे रंगभूषा, केशभूषा करणारे, तंत्रज्ञ, या सार्यांचेच घर यामुळे चालते, हाही व्यावसायिक भाग यात आहे; परंतु समाजाच्या उन्नतीसाठी या सार्यांची फलनिष्पत्ती काय आहे ? शून्य. त्यामुळे यात किती वहावत जायचे, याचे भान ठेवायला हवे. यापेक्षा आज ठायी ठायी दिसणार्या सामाजिक प्रश्नांविषयी या सर्वांनी आवाज उठवला, तर खर्या अर्थाने ती लोकाभिमुख पत्रकारिता साध्य होईल.
– सौ. रूपाली अभय वर्तक, पनवेल.