
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयातील एका अधिवक्त्याने एका फौजदारी खटल्यात त्याची बाजू मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्ता अधिवक्ता रमेश कुमारन ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थित होते. या वेळी ते म्हणाले, ‘जर आरोपीच्या विरोधातील गुन्हा रहित झाला, तर मी आत्महत्या करीन.’ (निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी न्यायालयावर दबाव आणणे म्हणजे न्यायव्यवस्थेला वेठीस धरण्यासारखेच आहे ! अशांच्या विरुद्ध खरेतर कठोर कारवाई झाली पाहिजे. – संपादक)
यावर न्यायमूर्ती अभय एस्. ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईयान यांच्या खंडपिठाने अधिवक्त्याला ७ मार्चपर्यंत लेखी क्षमा मागण्यास सांगितले. न्यायमूर्ती ओक म्हणाले, ‘जर आम्ही तुमची याचिका स्वीकारली नाही, तर तुम्ही आत्महत्या कराल, अशी धमकी तुम्ही न्यायालयाला कशी देऊ शकता. तुम्ही अधिवक्ता आहात. आम्ही ‘बार कौन्सिल’ला तुमचा परवाना निलंबित करण्यास आणि गुन्हा नोंदवण्यास सांगू शकतो.’