
वॉशिंग्टन – रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला आर्थिक साहाय्य केल्याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प म्हणाले की, युक्रेनला लढण्यासाठी ३५० अब्ज डॉलर्स (३ सहस्र ५७ कोटी रुपये) देणे, हा बायडेन यांचा मूर्खपणा होता. याच खर्चात आपण आपले (अमेरिकेचे) संपूर्ण नौदल पुन्हा उभारू शकलो असतो. अमेरिका आणि युक्रेनमध्ये खनिज करार व्हावा, असे आपल्याला आता वाटत नाही, असेही ट्रम्प म्हणाले.
युरोपचे लोक आपल्यापेक्षा हुशार ! – ट्रम्प
ट्रम्प पुढे म्हणाले की, मला वाटते की, झेलेंस्की यांनी आमचे अधिक कौतुक केले पाहिजे; कारण अमेरिका प्रत्येक कठीण काळात युक्रेनसमवेत उभा राहिला आहे. आम्ही युक्रेनला युरोपपेक्षा अधिक दिले आहे. खरे तर युरोपने युक्रेनला बरेच काही द्यायला हवे होते. युरोपचे लोक बायडेन यांच्यापेक्षा हुशार निघाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, युरोपने जे दिले, ते परत मिळवले; कारण त्यांनी केलेले साहाय्य कर्जरूपात होते. पैसा ही एक महत्त्वाजी गोष्ट आहे; पण मृत्यूही तितकाच महत्त्वाचा आहे आणि युक्रेन प्रत्येक आठवड्याला सहस्रो सैनिक गमावत आहे.
रशिया-युक्रेन करारासाठी युरोपीय देशांची संमती आवश्यक ! – ट्रम्प
डॉनल्ड ट्रम्प म्हणाले की, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये कोणताही करार करायचा असेल, तर त्यासाठी युरोपीय देशांची संमती घ्यावी लागेल. रशियाला करार करायचा आहे. युक्रेनच्या लोकांनाही करार हवा आहे, असे ट्रम्प म्हणाले.