कोल्हापूर : कार्यालयातील फलक तातडीने पालटणारे निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांचे हिंदुत्वनिष्ठांकडून अभिनंदन !

कोल्हापूर, ३ मार्च (वार्ता.) – जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सभागृहाचे नाव तात्काळ पालटणारे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांचे सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने त्यांच्या कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘दैनिक सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या सूचनेनंतर ‘छत्रपती शिवाजी सभागृह’, अशी पाटी पालटून ती ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृह’ करणारे श्री. संजय तेली यांनी जी तत्परता दाखवली, ती अभिनंदनीय आहे. अशीच तत्परता विद्यापीठ प्रशासनाने दाखवावी आणि विद्यापिठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’ पालटून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्यात पुढाकार घ्यावा.’’

या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, शिवसेना, भाजप यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.