
नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर), ३ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अशा थोर महापुरुषांचा उल्लेख हा नेहमी आदरानेच केला गेला पाहिजे. त्यामुळे ‘शिवाजी’ विद्यापिठाचा नामविस्तार हा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असाच झाला पाहिजे. तरी या नामविस्तारासाठी होणार्या मोर्चास आमचा पूर्ण पाठिंबा असून दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे सर्व साधक मोर्चात सहभागी होतील, अशी ग्वाही दिंडोरी येथील ‘स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्गा’चे विश्वस्त पू. चंद्रकांत दादासाहेब मोरे यांनी दिली. ते नृसिंहवाडी येथील जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
तत्पूर्वी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी पू. चंद्रकांत दादासाहेब मोरे यांना ‘शिवाजी’ विद्यापिठाच्या नामविस्ताराच्या संदर्भात होणार्या मोर्चाच्या संदर्भात माहिती दिली, तसेच श्री. सुनील घनवट यांनी पू. चंद्रकांत दादासाहेब मोरे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. या प्रसंगी ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील, सनातन संस्थेच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.