नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात तक्रार प्रविष्ट !
पुणे – लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमा भिंतीलगत अचानक उभ्या राहिलेल्या एका थडग्यामुळे (मजारमुळे) विमानतळाची सीमा भिंत पालटावी लागल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. या मजारसाठी जागा मोकळी करण्यासाठी भिंत थोडी आत वळवण्यात आली असून त्यामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. या संदर्भात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. हे थडगे बेकायदेशीर असून पूर्वी येथे नव्हते, असा दावा तक्रारदाराने केला आहे. अचानक निर्माण झालेल्या या थडग्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून हे बांधकाम तातडीने हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या रस्त्यावरून प्रतिदिन प्रवास करणार्या एका नागरिकाने आश्चर्य व्यक्त करत सांगितले की, केवळ एका रात्रीत हे थडगे उभे राहिले आणि विमानतळाची सीमा भिंत वाकवण्याइतपत मोठा पालट करण्यात आला. एवढे मोठे काम एका रात्रीत घडल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तक्रार गांभीर्याने घेतली असून लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहितीही मिळाली आहे. (पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाणी एका रात्रीत थडगे उभे रहाते आणि त्यासाठी विमानतळाच्या सीमेच्या भिंतीत पालट केला जातो, ही घटना अत्यंत गंभीर आहे, तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते. अशा अतिक्रमणांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे. प्रशासनाने कुणाच्याही दबावाला बळी न पडता कठोर पावले उचलावीत, हीच नागरिकांची अपेक्षा आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|