योग्य व्यायाम आणि आरोग्यपोषक रहाणी यांमुळे मनुष्य निरोगी अन् सामर्थ्यसंपन्न होऊ शकणे

‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांतील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयी शंकानिरसन, ‘एर्गोनॉमिक्स’चे (ergonomics) तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम’ यांची माहिती सादर करणार आहोत. वाचक आणि जिज्ञासू यांना व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. आपण या लेखात ‘योग्य व्यायाम आणि आरोग्यपोषक रहाणी’ यांमुळे मनुष्य निरोगी अन् सामर्थ्यसंपन्न होऊ शकतो’, याविषयी जाणून घेऊया.’

१. ‘शरीरसामर्थ्य मिळवण्याची तीव्र इच्छा, व्यायामावर श्रद्धा आणि व्यायाम करण्यातील सातत्य अन् चिकाटी’ यांमुळे होत असलेले लाभ

‘काही भाग्यवान माणसांना जन्मतःच सुंदर शरीर आणि संपत्ती मिळालेली असते. याउलट पुष्कळ माणसे जन्मतः रोगी आणि अशक्त असतात. असे असले, तरीही अशक्त माणसांनी निराश होण्याचे कारण नाही. मनुष्याने योग्य व्यायाम अणि आरोग्यपोषक रहाणी ठेवली, तर तो निश्चितपणे निरोगी अन् सामर्थ्यसंपन्न होऊ शकतो. ‘व्यायामाने इष्ट हेतू साध्य होईल’, अशी श्रद्धा हवी. शरीरसामर्थ्य मिळवण्याची तीव्र इच्छा पाहिजे. नुसत्या इच्छेने कार्य होत नसते. त्यासाठी नियमित आणि चिकाटीने कार्य केले पाहिजे. ‘आपण जी सामर्थ्यसंपन्न माणसे पहातो, त्यांतील बहुतेकांनी ते अनुकूल परिस्थिती नसतांनाही प्रयत्नाने मिळवले आहे’, असे आपणास दिसून येईल. या संदर्भात संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे,

‘असाध्य तें साध्य करितां सायास ।
कारण अभ्यास तुका म्हणे’ ।।

– तुकाराम गाथा, अभंग २९८, ओवी ३

(अर्थ : सतत प्रयत्न केल्याने असाध्य गोष्टीही साध्य होतात. त्याला अभ्यास हेच कारण आहे.)

२. ‘उत्तम आरोग्य आणि शरीरसामर्थ्य’ मिळवण्यासाठी लक्षात घ्यायाची सूत्रे

आरोग्य आणि शरीरसामर्थ्य मिळवण्याचा मार्ग सरळ अन् सोपा आहे. त्यामध्ये गुप्त असे काही नाही. नियमित आणि योग्य मार्गाने व्यायाम केला पाहिजे. ‘पी हळद आणि हो गोरी’ अशा रितीने इष्ट हेतू कधीच साध्य होत नाही. ‘मोठ्या श्रमाने पुष्कळ लाभ व्हावा’, अशी पुष्कळांची इच्छा असते; पण निसर्गाचा तसा नियम नाही. जितके आपण द्यावे, तितकेच परत मिळते. थोडे देऊन अधिक मिळणे शक्य नाही. ‘नियमित व्यायाम, योग्य आहार, स्वच्छता, निर्व्यसनी जीवन, पुरेशी विश्रांती आणि वीर्यरक्षण’ या गोष्टींकडे लक्ष दिले, तर आरोग्य अन् शरीरसामर्थ्य उत्तम प्रकारे मिळवणे आणि राखणे शक्य आहे.’

– श्री. शं. धों. विद्वांस, संपादक, मासिक ‘व्यायाम’

(साभार : मासिक ‘व्यायाम’)