
१. घरी कधीही न केलेल्या सेवा गुरुदेवांचा जप करत केल्यामुळे त्या विनासायास करू शकणे
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला अन्नपूर्णाकक्षात सेवा करण्याची संधी मिळाली. मी घरी असतांना कधीही न केलेल्या सेवा मी येथे करू शकत होतो. रवा भाजणे, खोबरे किसणे, कांदा चिरणे इत्यादी सेवा करतांना मी गुरुदेवांचा जप करत असल्याने त्या सर्व सेवा मी विनासायास करू शकत होतो.
२. ‘एका संतांचा सत्संग मिळणार आहे’, असे समजल्यावर आनंद वाटून डोळ्यांत भावाश्रू येणे आणि ‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच ही संधी लाभली आहे’, असे वाटणे
दुसर्या दिवशी सकाळी मी अन्नपूर्णा कक्षातील अल्पाहाराची सेवा पूर्ण करून अन्य एका सेवेसाठी दुसरीकडे गेलो. तेथे मला ‘आज तुम्हाला एका संतांचा सत्संग मिळणार आहे’, असे सांगण्यात आले. ते ऐकून मला पुष्कळ आनंद झाला आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. माझ्या अंगाला कंप सुटला होता. त्या दिवशी ‘मला काय वाटत होते’, ते मी सांगू शकत नाही. मला वाटले, ‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच मला आज ही संधी लाभत आहे.’

३. एका संतांच्या सत्संगाच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती
अ. सत्संगाच्या वेळी संतांना पाहून ‘माझा आत्मा शुद्ध झाला आहे’, असे मला वाटले.
आ. काही वेळानंतर जेव्हा मी त्यांना पाहिले, तेव्हा अकस्मात् मला ‘त्यांची संपूर्ण कांती गुलाबी झाली आहे’, असे दिसले. त्यांनी त्यांच्या हाताचा तळवा माझ्या दिशेने केल्यावर मला तो तळवासुद्धा गुलाबी दिसला. त्या वेळी ‘ते मला आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.
इ. अकस्मात् माझे लक्ष माझ्या हातांच्या तळव्यांकडे गेले. तेव्हा तेही गुलाबी झाले होते.
ई. संतांनी माझ्याकडे पाहून स्मित केले. त्या वेळी ‘माझ्या जीवनातील सर्व दुःखे संपुष्टात आली’, असे मला जाणवले.’
– श्री. सिद्धेश विजय मोरे, विरार, पालघर, महाराष्ट्र.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |