बसस्थानके-आगार यांमधील भंगार आणि जप्त गाड्या १५ एप्रिलपर्यंत निष्काषित करा !

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा आदेश !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – स्वारगेट बसस्थानकावर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व बसस्थानके आणि आगार येथील सुरक्षा व्यवस्थेचे लेखापरीक्षण करण्याची सूचना दिली आहे, तसेच १५ एप्रिलपर्यंत भंगारात काढलेल्या आणि जप्त करण्यात आलेल्या सर्व गाड्या निष्काषित करण्याचा आदेश दिला आहे. परिवहन विभागाकडून याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

नवीन बसगाड्यांमध्ये सी.सी.टी.व्ही. आणि जी.पी.एस्. यंत्रणा लावण्याची सूचना !

राज्यभरात सर्वच एस्.टी. बसस्थानके आणि आगारांमध्ये सीसीटीव्ही, तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत यंत्रणा उभारण्यात यावी. नवीन येणार्‍या बसमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात यावे. बसेसमध्ये ‘जी.पी.एस्.’ यंत्रणा (बस कुठे आहे याचे ठिकाण समजण्यासाठी लावण्यात येणारी यंत्रणा) बसवण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. आगार व्यवस्थापकांनी तेथील निवासस्थानी वास्तव्य करावे, जेणेकरून २४ घंटे त्यांच्या निरीक्षणाखाली आगाराचे व्यवस्थापन चालेल.

महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात यावी. स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने बसस्थानकांवरील गस्त वाढवण्यात यावी. परिवहन महामंडळाकडे रिक्त असलेल्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पदांवर भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस्.) अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी. याविषयीचा प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करावा, अशा प्रताप सरनाईक यांनी दिल्या. बसस्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा प्रताप सरनाईक यांनी घेतला.

बसस्थानकावर काम करणार्‍या प्रत्येक एस्.टी. कर्मचार्‍याला ओळखपत्र देण्यात यावे; जेणेकरून कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांना कुणी लुबाडणार नाही आदी सूचना परिवहनमंत्र्यांनी शासकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

संपादकीय भूमिका :

हे पूर्वीच का केले नाही ? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सरकार का जागे होते ?