India Slams Pakistan In UN : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय साहाय्यावर पोसलेला देश !

संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा एकदा फटकारले !

भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी क्षितिज त्यागी

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र असून आंतरराष्ट्रीय साहाय्यावर ते पोसले जात आहे. पाकिस्तानचे सैन्य आणि आतंकवादी संघटना यांची युती लपवून पाकिस्तान स्वतःची प्रतिमा तर मलीन करतच आहे, याखेरीज संयुक्त राष्ट्रांसारख्या  आंतरराष्ट्रीय मंचाचाही गैरवापर करत आहे, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५८ व्या सत्रातील बैठकीत पाकला पुन्हा एकदा फटकारले.

या बैठकीत भारताचे प्रतिनिधी क्षितिज त्यागी यांनी पाकला सुनावतांना म्हटले की,

१. पाकिस्तानकडून दिल्या जाणार्‍या प्रतिक्रिया दुटप्पी आणि अमानवीय वृत्तीने भरलेल्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे अन् राहील. गेल्या काही वर्षांत या भागातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर मोठी प्रगती झाली आहे. भारत सरकार ‘आतंकवादमुक्त धोरण’ आखत असल्याचाच हा पुरावा आहे.

२. पाकिस्तानचे नेते त्यांचे सैन्य आणि आतंकवादी संघटनांचे संबंध लपवू पहात आहेत. ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओआयसी – इस्लामी सहकार्य संघटना) याचे मुखपत्र म्हणून पाकिस्तानकडून वापर होत आहे. पाकिस्तानात अस्थिरता असून तो आंतरराष्ट्रीय साहाय्यावर टिकून आहे. त्यांच्याकडून संयुक्त राष्ट्र परिषदेचा वेळ वाया घालवणे दुर्दैवी आहे. भारताने नेहमीच लोकशाही, विकास आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान टिकवण्यावर भर दिला.

३. पाकिस्तानात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असून अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्यामुळे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.

४. संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या आतंकवाद्यांना पाकिस्तान आश्रय देतो. पाकिस्तान स्वतःच एका अस्थिर शासन प्रक्रियेचा बळी आहे. अशात पाकिस्तानने दुसर्‍या देशाला शिकवू नये. पाकिस्तानने स्वतःच्या देशातील नागरिकांच्या समस्या काय आहेत ? हे जाणून घ्यावे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.

संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानने काय म्हटले होते ?

पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री आझम नजीर तरार यांनी संयुक्त राष्ट्रांकडे दावा केला होता की, काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, जे थांबवले पाहिजे. जनतेचा स्वयंनिर्णयाचा अधिकार सतत नाकारला जात आहे. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकिस्तानात गेली ७७ वर्षे अल्पसंख्यांकांच्या संदर्भात जे काही घडत आहे, ते जग प्रत्यक्षात पहात आहे; मात्र पाकच नाही, तर संपूर्ण जग गप्प आहे. हाच पाक तोंड वर करून भारताच्या काश्मीरविषयी विधाने करण्याचा प्रयत्न करतो ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • पाकला शब्दांतून नाही, तर शस्त्रांद्वारे फटकारणे आवश्यक आहे. गेंड्याच्या कातडीच्या पाकला तीच भाषा समजते.
  • पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचे सूत्र उपस्थित करतो आणि भारत त्यावर प्रत्युत्तर देत रहातो, हे आणखी किती वर्षे चालणार ? पाकचे अस्तित्व संपवणेच आता अपरिहार्य झाले आहे !