१. होमिओपॅथी वैद्या आरती तिवारी (भरतनाट्यम् विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.
‘२४.२.२०२२ या दिवशी ‘महाशिवरात्री’निमित्त झालेल्या विशेष भक्तीसत्संगाच्या वेळी होमिओपॅथी वैद्या आरती तिवारी यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१ अ. झालेले त्रास
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेला भक्तीसत्संग पुष्कळ परिणामकारक जाणवत होता. त्याचा परिणाम म्हणजे सत्संगात मधेच दोन वेळा माझे डोके जड झाले आणि माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले.
२. काही क्षण माझ्या मनात अस्वस्थताही निर्माण झाली होती; परंतु हा वाईट शक्तींचा त्रास असल्याचे माझ्या लक्षात आले. सत्संगातील चैतन्यामुळे माझा त्रास त्वरित उणावला.

१ आ. भक्तीसत्संगाच्या वेळी साधिकेने अनुभवलेली भावस्थिती
१ आ १. भक्तीसत्संगाला आरंभ होण्याआधी ५ ते १० मिनिटे आणि सत्संग संपल्यानंतर काही घंटे ‘आजच महाशिवरात्र आहे’, असे मला वाटत होते. प्रत्यक्षात त्या दिवशी महाशिवरात्र नव्हतीच.
१ आ २. कैलास पर्वताच्या छायाचित्रातील ‘शिवाचा झालेला चरणस्पर्श’ हे स्थान दाखवत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे दर्शन होणे : भक्तीसत्संगात कैलास पर्वतावर शिवाचा चरणस्पर्श झालेले स्थान ‘ऑनलाईन’ दाखवत होते. तेव्हा मला ‘चरणस्पर्श’ या स्थानाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे दर्शन झाले आणि नंतर पर्वताच्या ठिकाणी श्वेत सदरा घातलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विशाल रूपात दर्शन झाले.
१ आ ३. भक्तीसत्संगात दाखवलेल्या चित्रातील मानस सरोवरातील पाण्याचे मानस दर्शन घेतांना मला तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विष्णुस्वरूपात दर्शन झाले.
१ आ ४. भक्तीसत्संगात लावलेले शिवावर आधारित गीत ऐकत असतांना मी मानस नृत्य करत होते. तेव्हा ‘मी ‘आनंदतांडव’(टीप) हा नृत्य प्रकार करत आहे’, असे मला जाणवले आणि माझे मन आनंदी झाले.
(टीप – आनंदतांडव : शंकराने केलेल्या नृत्याला ‘तांडव नृत्य’, असे म्हणतात. सर्व दु:खातून मुक्त होऊन ‘आत्मा’ आनंदमय स्थितीला गेल्याचा अभिनय ‘आनंदतांडव’ या नृत्याच्या माध्यमातून सादर केला जातो.)
१ आ ५. भक्तीसत्संग चालू असतांना मंद स्वरात वीणावादन लावले होते. त्यामुळे ‘माझ्या पेशीपेशी वीणेच्या नादाने आनंदित होऊन डोलत आहेत आणि नृत्य करत आहेत’, असे मला वाटत होते.
१ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आवाजातील भक्तीसत्संग ऐकत असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे
१ इ १. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आवाजातील भक्तीसत्संग ऐकतांना ‘सर्व साधकांना शिवतत्त्वाचा लाभ अधिक प्रमाणात होत आहे’, असे साधिकेला जाणवणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना ‘ब्रह्मांडातील नादशक्ती कार्यरत होऊन शिवाचे गुणगान करत आहे. त्यामुळे वातावरणात शिवतत्त्व अधिक प्रमाणात निर्माण होऊन सर्व साधकांच्या अंतरंगात नादलहरी आणि आनंदलहरी यांचे प्रक्षेपण होत आहे. सर्व साधकांना शिवतत्त्वाचा लाभ अधिक प्रमाणात होत आहे’, असे मला जाणवले.
१ इ २. ‘भक्तीसत्संगात अनेक साधक जिवांना शांतीची अनुभूती एकाच वेळी घेता आली’, असे जाणवणे : ‘भक्तीसत्संगात लावलेले मंद स्वरातील वीणावादन, शिवावर आधारित गीत, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ दैवी वाणीतून सांगत असलेली महाशिवरात्रीच्या संदर्भातील सूत्रे आणि सत्संगात दाखवली गेलेली पवित्र तीर्थक्षेत्रांची विविध छायाचित्रे’ या सर्वांमुळे भक्तीसत्संगाची परिणामकारकता पुष्कळ अधिक होती. ‘अनेक साधक जिवांना शांतीची अनुभूती एकाच वेळी घेता आली’, असे मला जाणवले.
१ ई. भक्तीसत्संग संपल्यावर माझे मन शांत झाले. मला ही शांतता भक्तीसत्संगानंतरही पुष्कळ वेळ अनुभवता आली.
या सर्व अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
२. सौ. आराधना चेतन गाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. ‘महाशिवरात्री’च्या निमित्ताने २४.२.२०२२ या दिवशी विशेष भक्तीसत्संग आहे’, हे मला आधी ठाऊक नव्हते, तरी सकाळपासून माझा कृतज्ञताभाव सतत जागृत होत होता.
२ आ. भावजागृती होऊन स्वतःचे अस्तित्व विसरणे
भक्तीसत्संगाला आरंभ झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची वाणी ऐकून माझे मन कृतज्ञतेने भरून गेले. भक्तीसत्संग संपेपर्यंत माझ्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू वहात होते. मी सत्संगातील माझे अस्तित्व विसरले होते.
२ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी करून घेतलेल्या भावप्रयोगांत दिसलेली विविध दृश्ये
१. सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी कैलास पर्वताचे मानस दर्शन घेण्याचा भावप्रयोग घेतला. तेव्हा ‘मी खरोखरंच कैलास पर्वतावर आहे आणि कैलासाचे दर्शन घेत आहे’, असे दृश्य मला दिसले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भगवान शंकरस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचे वर्णन करू लागल्या. तेव्हा ‘मी त्या रमणीय आणि अत्यंत सुंदर अशा कैलास पर्वतावर एकाग्रचित्त होऊन नृत्य करत आहे’, असे दृश्य मला दिसले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची वाणी ऐकतांना काही वेळा मला ‘भगवान शंकर प्रगट होऊन तांडव नृत्य करत आहेत’, असे दृश्य दिसत होते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची चैतन्यमय वाणी ऐकतांना आणि भगवान शंकरांचे ते नटराज रूप पहातांना ‘हा क्षण कधी संपूच नये’, असे मला वाटत होते.
२ ई. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आम्हा सर्व साधकांना भगवान शंकरांशी एकरूप होण्यासाठी हा भक्तीसत्संग घेतला आहे’, असे मला वाटले.
२ उ. कृतज्ञता
असे हे आनंदाचे क्षण अनुभवायला दिल्यामुळे मी परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |