संपादकीय : पाताळयंत्री हिंदुभेदी पुरोगामी यंत्रणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा खरा धीरोदात्त पराक्रम सामोरा आणणारा आणि क्रूरकर्मा औरंगजेबाचे प्रचंड हिंदुद्वष्टे राक्षसी रूप उघडे पाडणारा ‘छावा’ चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजत आहे. कधी नव्हे एवढा निद्रिस्त हिंदूंवर त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे. भारतभरातील कित्येक हिंदूंना जिहादी औरंग्याचे खरे स्वरूप समजल्याने कित्येक सुजाण हिंदूंचे डोळे उघडले आहेत. त्यांना प्रश्न पडला आहे, ‘‘हा सत्य इतिहास आम्हाला का शिकवला गेला नाही ?’’ तसे ते सामाजिक माध्यमांतून व्यक्त होत आहेत. ‘हिंदवी स्वराज्याच्या शत्रूच्या स्मारकाचा उदोउदो कसा चालू आहे ?’, हेही पुढे आल्याने कित्येकांच्या पोटात गोळा आला आहे. या आतंकी प्रवृत्तीच्या विरोधात हिंदुत्वाची जाण असलेले एकप्रकारे आता सामाजिक माध्यमांतून का होईना, संघटित होऊ लागले आहेत. सामान्य हिंदूही आता हिंदुत्वाच्या विचाराने जागृत होऊ लागले आहेत. यामुळे आतापर्यंत पुरोगाम्यांनी पसरवलेला धादांत खोटा इतिहास असत्य असल्याचे बिंग फुटले आहे. ‘छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारून नंतर गुढीपाडवा चालू केला’, हा ३६० अंशातून विरोधात जाणारा इतिहास मुसलमानप्रेमी विद्रोही पुरोगाम्यांनी पसरवून आतापर्यंत केलेला घोर इतिहासद्रोह आणि स्वधर्म, स्वदेशवासीय यांच्या संदर्भात केलेले पाप पुरते उजेडात आले आहे. पुरोगाम्यांचे पितळ उघडे पडून हिंदूंनी एकत्र येण्यामुळे पुरोगाम्यांच्या नाकात दम येऊ लागला आहे. त्यांचा पोटशूळ त्यांना गप्प बसू देत नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा पाताळयंत्री, षड्यंत्री पुरोगाम्यांची एकमेकांना साहाय्य करून हिंदुत्वाचे खच्चीकरण करण्याची यंत्रणा (‘इको सिस्टम’) वेगाने कार्यरत झाली आहे.

पुरोगामी यंत्रणेची कार्यपद्धत

ज्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी नियोजनबद्धरित्या आणि पद्धतशीरपणे  हिंदूंच्या देवता, धर्म, महापुरुष, मानचिन्हे आदींना तुच्छ लेखून ‘हिंदु धर्माभिमान म्हणजे ‘जातीयवाद’ आणि ‘मुसलमानांचा पुरस्कार म्हणजे ‘निधर्मीपणा’ या धोरणाला खतपाणी घातले, त्याच हिंदी चित्रपटसृष्टीला सध्या ‘छावा’सारख्या चित्रपटाने धर्मांधांच्या जिहादी वृत्तीचा बुरखा फाडून चपराक दिली आहे. हीच धर्मांधांना मिळालेल्या पुरोगाम्यांची खरी खदखद आहे. चित्रपटाला मोठी प्रसिद्धी मिळाल्यावर लगेचच काही दिवसांत ‘स्वरा भास्कर’सारख्या अभिनेत्रींनी हिंदूंच्या महापराक्रमी योद्ध्यांच्या, ज्या २ छत्रपतींमुळे आज हिंदुत्व टिकून आहे, त्या छत्रपतींच्या इतिहासाला तुच्छ लेखून हिंदूंचे खच्चीकरण करण्यास आरंभ केला; परंतु अशा प्रतिक्रियांनी काहीच फरक पडत नाही, हे लक्षात आल्यावर पुरोगाम्यांनी हिंदूंच्या जातीव्यवस्थेच्या संवेदनशील सूत्रालाच हात घालून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा जोरदार प्रयत्न चालू केला. ‘शिर्के यांच्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले, हा इतिहास खरा नसून ते ब्राह्मणांमुळे पकडले गेले’, असा पूर्वीचाच जावईशोध पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आणि इंद्रजित सावंत यांच्यासारखे पुरोगाम्यांचे तथाकिथत इतिहासकार हिरीरीने पुढे आले. लगेच माध्यमांनीही हा वादाचा विषय उचलला आणि वाहिन्यांवर चर्चासत्रे झडू लागली.    चित्रपटात खोटा इतिहास दाखवला जात असल्याची आवई उठवून चित्रपट बंद पाडण्यापर्यंत विषय नेण्यात माध्यमांनी समाधान मानले. चित्रपट कलाकार, लेखक, इतिहासकार, माध्यमे असे एकमेकाला पूरक म्हणून उभे राहिले. आता हा विषय कदाचित् न्यायालयापर्यंतही जाऊ शकतो आणि तिथेही पुरोगाम्यांना साथ देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली, तर आश्चर्य वाटायला नको. उत्तरप्रदेशातील एका शाळेत डब्यात मांसाहार नेण्यास शाळेने एका विद्यार्थिनीला बंदी घातल्यावर अशिक्षित, गरीब मुसलमान पालक त्या शाळेच्या विरोधात न्यायालयात जातात आणि त्यांचे अधिवक्ते कोण असतात, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल ! हे आहे पुरोगामी यंत्रणेचे मोठे उदाहरण ! अशाच प्रकारे यंत्रणा येथेही कार्यरत असल्याचे लक्षात येते.

ब्राह्मणद्वेष पसरवण्याचाच उद्देश

आताही एका डॉ. कोल्हटकर या ब्राह्मण व्यक्तीच्या आवाजात इतिहासकार सावंत यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ प्रसारित करून तो वृत्तवाहिन्यांना पाठवण्यात आला आहे. संबंधित डॉ. कोल्हटकर यांच्याकडे सावंत यांचा क्रमांकही नाही, त्यांच्याशी बोलणे तर दूरच. प्रत्यक्षात या वादाशी त्यांचा यत्किंचितही संबंध नसल्याने ते अब्रूहानीचा दावा करणार असल्याचे वृत्त आहे; परंतु हा न्याय लागेल तेव्हा लागेल. आता मात्र माध्यमांतून ब्राह्मणांनी धमकी दिल्याच्या वृत्ताला यथोचित प्रसिद्धी दिली गेल्याने पुरोगामी जातीद्वेष्ट्यांचा कुटील हेतू साध्य झाला आहे आणि पुरोगाम्यांची यंत्रणा यशस्वी झाल्याने पुरोगाम्यांच्या मुखावर हास्य उमटले आहे.

हिंदूंनो, पुरोगाम्यांची यंत्रणा अशी मोडा !

पुरोगाम्यांनी सातत्याने धादांत खोटा, जातीद्वेषी इतिहास पसरवत रहायचा आणि हिंदुत्वनिष्ठांनी नेहमी त्याची उत्तरे देत बसायची, हा प्रकार आता बंद पाडायला हवा. हिंदुत्वनिष्ठांनी आता या नकली पुरोगाम्यांना प्रश्न केले पाहिजेत आणि त्याची उत्तरे देणे भाग पाडले पाहिजे. सर्व हिंदू एक झाले, संघटित झाले, तर पुरोगाम्यांची डाळ अधिक दिवस शिजणार नाही. इथे शिर्के गद्दार होते किंवा नव्हते ?, हा प्रश्न गौण रहातो; मात्र ‘पुरोगामी आणि त्यांच्या मागे असलेल्या राष्ट्रघातकी मंडळींना हिंदूंचे विभाजन होतांना पाहून आनंदाच्या उकळ्या फुटत रहातात’, हे अधिक धोक्याचे आहे. काही वेळा राजकारणीही त्यांची पोळी यावर भाजून घेतात. त्यामुळे म्हातारी मेली तरी चालेल, काळ सोकावता कामा नये. त्यासाठी हिंदूंनी वैचारिक प्रतिवादाद्वारे संघटितपणाचा मोठा आविष्कार दर्शवून पुरोगाम्यांच्या यंत्रणेला भगदाड पाडले पाहिजे. श्रीपाल सबनीस यांच्यासारखे लेखक करत असलेली ब्राह्मणद्वेषी वक्तव्य किंवा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर यांना येणार्‍या धमक्या हा सर्व पुरोगामी यंत्रणेचाच एक भाग आहे.

हिंदूंनो, एक व्हा !

ब्राह्मणांसह सर्व हिंदूंनी आता एक होण्याची हीच वेळ आहे. ब्राह्मण संघटनांनी असा खोटा इतिहास पसरणार्‍यांवर अब्रूहानीचे खटले प्रविष्ट केले पाहिजेत. असे १-२ नव्हे, तर गावागावांतून या असा जातीद्वेष पसरवणार्‍यांवर खटले प्रविष्ट झाले, तरच केवळ ब्राह्मणांसह हिंदु समाज न फुटता या पुरोगाम्यांच्या वावटळीला तोंड देऊ शकतो. धमकीचा कथित व्हिडिओ ऐकतांनाच ‘यात काहीही धमकी दिलेली नाही आणि बोलणारी व्यक्ती ब्राह्मण समाजाची नाही’, हे लगेचच लक्षात येते. असो. हा ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद नाही, हे प्रथम हिंदूंनी लक्षात घ्यावे. हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !