ऐतिहासिक अभिव्यक्ती !

‘छावा’ या चित्रपटाचे पोस्टर

आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. त्यात सामाजिक माध्यमांचा वाटा मोठा आहे; कारण या माध्यमांतून प्रत्येक जण व्यक्त होत असतो. विविध विषयांवर आपापली मते, विचार आणि प्रतिक्रिया यांद्वारे मांडल्या जातात. त्या समाजापर्यंत अल्प वेळेत पोचतात. हे सर्वश्रुत आहे; पण एखाद्या विषयावर एकाच वेळी समाजातील सर्व स्तरांच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात मनमोकळेपणाने व्यक्त होणे हे आतापर्यंत कधीच घडलेले नाही. हे साध्य करून दाखवले आहे ‘छावा’ या चित्रपटाने ! छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणार्‍या या चित्रपटाने समाजातील सर्वच प्रकारच्या लोकांना जागृत केले आहे. ‘चित्रपट पाहून काय वाटले ?’, याविषयीच्या भावना किंवा विचार प्रत्येकाने सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’द्वारे व्यक्त केले. अनेकांनी आवर्जून याच विषयाच्या पोस्ट लिहिल्या. चित्रपटगृहातील व्हिडिओही मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. जो भेटतो, तो एकमेकांशी ‘छावा’विषयी बोलू लागला. प्रत्येकाचे डोळे या चित्रपटाने पाणावले, प्रत्येकजण घोषणा देण्यास किंवा बिरुदावली म्हणण्यास सिद्ध झाला. चित्रपट संपला, तरी ‘चित्रपटगृहातून उठून जाऊच नये’, हा क्षण प्रत्येकाने अनुभवला. प्रत्येकाचा धर्माभिमान जागृत झाला. केवळ एका चित्रपटाने सामाजिक स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली जागृती पाहून अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य झाली. आजूबाजूचे वातावरण ‘छावा’मयच झाले होते. अर्थात् अजूनही ते तसे आहे. ‘एका ऐतिहासिक चित्रपटाने साधलेला हा ‘ऐतिहासिक’ परिणाम निश्चितच वाखाणण्यासारखा आहे’, असे म्हणता येईल.

बरेचदा असे होते की, मनुष्य विचार करतो; पण त्याला ते विचार लिहायचे म्हटले की, मर्यादा येते; पण ‘छावा’विषयी व्यक्त होतांना ही मर्यादा कुठेच दिसून आली नाही. जो तो मोकळेपणाने व्यक्त झाला; कारण ‘छावा’ प्रत्येकाच्या मनापर्यंत जाऊन भिडला ! हीच ऐतिहासिक प्रेरणा असते. ती एकदा कार्यरत झाली की, समाजमनही भारीत होते. ही इतिहासाची किमया आहे; म्हणूनच तर म्हटले जाते ना, ‘इतिहास हा जरी भूतकाळात जमा झाला असला, तरी तो भविष्यकाळ घडवतो’, हे ‘छावा’ने सिद्ध करून दाखवले. ‘छावा’ने प्रत्येकाला हाती लेखणी घ्यायला लावली. हिंदूंनी आता ती लेखणी केवळ एका पोस्टपुरती मर्यादित न ठेवता राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील विचार समाजापर्यंत पोचवण्यासाठी ती नेहमी कार्यरत ठेवली पाहिजे. ही लेखणी साधीसुधी नसून राष्ट्र-धर्म लढ्यातील मोठे शस्त्र आहे, हे लक्षात ठेवावे. या लेखणीद्वारे अभिव्यक्त होत प्रत्येकाने राष्ट्र-धर्म कर्तव्य पार पाडायला हवे. हिंदूंनो, ‘छावा’ने केलेली धर्मजागृती वृद्धींगत होण्यासाठी आता कृतीशील होऊया !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.