अबूधाबी – भारत अमेरिकेकडून आतापर्यंत शस्त्रास्त्र खरेदी करत आला आहे; परंतु अमेरिका आता भारताकडून शस्त्रास्त्र खरेदी करणार आहे. भारताची अत्याधुनिक स्वदेशी तोफ खरेदी करण्यासाठी अमेरिकी आस्थापन ‘ए.एम्. जनरल मोटर्स’ने ‘भारत फोर्ज लिमिटेड’सोबत करार केला आहे. या करारानुसार भारताची निर्मिती असलेल्या या प्रगत तोफेची खरेदी अमेरिका करणार आहे.
१. अबूधाबीमध्ये आयोजित ‘आय.डी.ई.एक्स्. २०२५’ संरक्षण प्रदर्शनात हा करार झाला. अमेरिकेतील ‘ए.एम्. जनरल मोटर्स’ ही जगातील प्रमुख सैन्य वाहन निर्मिती करणारे आस्थापन आहे. कधीकाळी शस्त्रास्त्रांची आयात करणारा भारत आता शस्त्रास्त्रांची निर्यात करू लागला आहे. भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र यापूर्वी फिलिपिन्सला विकले आहे. आता अमेरिकी आस्थापनासोबत झालेला करार म्हणजे संरक्षणक्षेत्रात भारताचा दबदबा वाढत असल्याचे सिद्ध होत आहे.
२. फोर्जच्या तोफा पूर्णपणे ‘इलेक्ट्रिक ड्रायव्ह सिस्टम’वर चालतात. हा करार भारत अन् अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या सहकार्याचे संदेश देणारे आहे.
३. या करारानंतर भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले की, हा आपल्या तांत्रिक क्षमतेचा पुरावा आहे. हा करार ‘ए.एम्. जनरल’सारख्या आघाडीच्या जागतिक संरक्षण कंपन्यांचा आपल्या क्षमतांवरील विश्वास दर्शवतो.