ग्वादर येथे पशूवधगृह उघडण्यात येणार
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या मोठी आहे. तो चीनला मोठ्या प्रमाणात गाढवे निर्यात करतो. आता पाकिस्तान चीनला गाढवाचे मांस, कातडी आणि हाडे निर्यात करणार आहे. चीनची ही मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान ग्वादरमध्ये एक पशूवधगृह उघडणार आहे. पाकिस्तानमध्ये गाढवांचा वापर वाहन म्हणून मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने या निर्णयावरून पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे. इस्लामी परंपरेत गाढवाला शुद्ध मानले गेले आहे.
ग्वादरमध्ये ७० लाख रुपयांत बांधण्यात येणार्या या पशूवधगृहात ३ लाख गाढवांचे कातडे काढून जिलेटिन बनवण्यात येईल. जिलेटिनमुळे रक्ताभिसरण सुधारते, वाढते आणि कर्करोगाचा धोका देखील अल्प होतो. गाढवाच्या कातडीत आढळणार्या कोलेजनपासून बनवलेल्या आगिओचे (चिनी औषधामध्ये वापरण्यात येणार्या घटकाचे) बाजारमूल्य प्रतिवर्षी अंदाजे ८ अब्ज डॉलर्स (६ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) आहे. चीन हा त्याचा सर्वांत मोठा ग्राहक आहे. जिलेटिनची मागणी पूर्ण करण्यासाठी जगभरात प्रतिवर्षी ६० लाख गाढवे मारली जातात. आफ्रिकन युनियनने गाढवाच्या कातडीवर बंदी घातल्यानंतर चीनने त्यासाठी पाकिस्तानकडे मोर्चा वळवला आहे. या मागणीमुळे तस्करीचा धोका लक्षणीयरित्या वाढला आहे. ग्वादरमधील अनेक धार्मिक नेते आणि स्थानिक लोकांनी गाढवांच्या हत्येला विरोध केला आहे. अनेक ग्रामीण भागांत ते वाहतुकीचे मुख्य साधन आहे.