महाकुंभाच्या माध्यमातून झालेली कमाई हा जगभरातील अर्थतज्ञांसाठी एक चमत्कार !

सनातन अर्थशास्त्र हा जागतिक पातळीवरील विद्यापिठांमध्ये लवकरच एक अभ्यासक्रम म्हणून शिकवला जाणार आहे. यावेळच्या महाकुंभाला जगभरातील मोठमोठ्या विद्यापिठांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रयागराज येथे महाकुंभासाठी पाठवले होते. हे विद्यार्थी येथे राहून संपूर्ण कुंभमेळा आणि त्यामागील अर्थशास्त्र जाणून घेत होते.

महाकुंभाच्या आयोजनासाठी उत्तरप्रदेश सरकारने ७५०० कोटी रुपये व्यय केले. महाकुंभमेळा ४५ दिवस चालणार आहे. या मेळ्यात उत्तरप्रदेश सरकारला तब्बल २.५० लाख कोटी रुपयांची अर्थप्राप्ती झाली. या महाकुंभमेळ्याला ४५ कोटी लोक येतील, असा अंदाज होता; पण तो आकडा १० दिवस बाकी असतांनाच ओलांडला गेला असून एकूण ५५ कोटी लोक या सोहळ्याला भेट देतील, असा आताचा अंदाज आहे. केवळ ४५ दिवसांत तब्बल २३ बिलियन डॉलरर्सची (१ लाख ९९ सहस्र कोटी रुपयांची) कमाई होणे, हा जगभरातील अर्थतज्ञांसाठी एक चमत्कार आहे.

हे कसे साधले गेले ?, हा त्यांच्यासाठी अभ्यासाचा विषय आहे; परंतु आपल्या देशातील प्रत्येक सणवारसुद्धा शेतकर्‍याच्या हातात पैसे असतांना, पीक आले असतांनाच अवतरतो आणि संपूर्ण अर्थचक्र चलित ठेवतो. हे आपण गेली शेकडो वर्षे बघत आलो आहोत. त्यामुळे जगात मंदी येवो अथवा तेजी, आपल्या देशातील अर्थचक्र अव्याहत चालूच असते. सनातन अर्थव्यवस्थेचे हे सामर्थ्य जगभरातील अर्थतज्ञ आता शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यासणार आहेत.

– श्री. सुजीत भोगले, पुणे. (१८.२.२०२५)