देशात प्रारंभ झाली संसर्गजन्य नसणार्‍या रोगांच्या तपासणीची विनामूल्य मोहीम

३१ मार्चपर्यंत चालणार अभियान

नवी देहली – केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संसर्गजन्य नसलेल्या रोगांविषयीचे सखोल चाचणी अभियान २० फेब्रुवारीपासून प्रारंभ केले असून ते ३१ मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे. यात ३० वर्षे वयावरील पुरुष आणि महिला यांची तपासणी केली जाणार आहे. त्यावरून किती लोक व्याधीग्रस्त आहेत अथवा त्यांना व्याधी जडू शकते, अशा नागरिकांची माहिती मिळू शकेल. अनुमाने ८९ कोटी नागरिक या मोहिमेचा भाग असतील. संसर्गजन्य नसलेले रोग आणि कर्करोगाचे तीन प्रकारांचे ( मुख, स्तन आणि गर्भाशय) निदान करणे अन् त्यासाठी योग्य ते उपचार निश्चित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

देशात मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोग यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आय.सी.एम्.आर्.) यांच्या आकेडवारीनुसार देशात ८० टक्के मृत्यू बिगर संसर्गजन्य रोगामुळे होतात.

तपासणी कशी असेल ?

१. ३० वर्षांपेक्षा अधिक लोकांचे ‘हेल्थ कार्ड’ बनवले जाईल. यावर आयडी अथवा आधार क्रमांक असेल. प्राथमिक स्तरावर वैद्यकीय अधिकारी अहवालात नोंद करतील.
यात आजार, निदानाची माहिती, उपचार करण्याचा तपशील असेल.

२. तपासणीसाठी ३० वर्षांपेक्षा अधिक वयाचे पुरुष आणि महिला जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करू शकतात. ती विनामूल्य असणार आहे. त्याचप्रमाणे आशासेविका, आरोग्यसेवक घरोघरी जाणार आहेत.

३.  संसर्गजन्य नसणारे म्हणजे एकापासून दुसर्‍यास होत नाहीत किंवा संपर्कातून होत नाहीत, असे रोग. आजार होण्यास दीघर्घ काळ लागतो; परंतु प्रारंभीची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. उपचार आयुष्यभर घ्यावे लागतात. अशा व्याधी अकाली मृत्यूचे प्रमुख कारण ठरतात.