सातारानगरी झाली ‘शिवमय’ !

सातारा, २० फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक सातारानगरी ‘शिवमय’ झाली होती. शहरातील प्रमुख मार्गावर चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणारे ऐतिहासिक देखावे, आकर्षक भगव्या कमानी, पताका, विद्युत् रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. प्रत्येक १०० मीटरवर उभारण्यात आलेल्या स्वागतकमानी आणि त्यावर साकारण्यात आलेले शिवरायांचे अष्टप्रधानमंडळ यांचे भव्य फलक शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होते. शहरातील गांधी मैदान, राजवाडा परिसरात छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांना चित्ररूप करून त्याचे भव्य फलक उभारण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त गांधी मैदान येथून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीमध्ये ऐतिहासिक वेशभूषेमध्ये युवती घोड्यावर स्वार झाल्या होत्या, तसेच केरळ येथील १०० जणांचे वाद्य पथक कलाकारांसह मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.