Army Chief Gen Upendra Dwivedi : सैन्याला राजकारणात ओढू नका ! – सैन्यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी

  • राहुल गांधी यांच्या विधानावर सैन्यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचे उत्तर

  • ‘चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे’, असे सैन्यदलप्रमुखांनी सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता !

डावीकडून सैन्यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि राहुल गांधी

नवी देहली – भारतीय सैन्यदलप्रमुखांनी म्हटले आहे की, चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे, असे विधान काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर सैन्यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी उत्तर देतांना म्हटले की, ‘सैन्याला राजकारणात ओढू नये.’ राहुल गांधी यांचे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच फेटाळून लावले होते.

सैन्यदलप्रमुख द्विवेदी म्हणाले की,

१. मला वाटते की, राजकीय उत्तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे आणि संरक्षण मंत्रालयाने त्याची माहिती दिली आहे; पण सैन्याने राजकारणात सहभागी होऊ नये, यासाठी मी प्रयत्न करणे आणि ते कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.

२. काळानुसार आपण प्रगती केली आहे आणि चीननेही प्रगती केली आहे. जेव्हा तुमच्याकडे अधिक सैनिक असतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्यासाठी निवासस्थाने द्यावी लागतात. त्यांना वाहतुकीची आवश्यकता आहे.

३. आपण कोणत्याही वादग्रस्त क्षेत्रात प्रवेश केला आहे, असे नाही. आपण जिथे आहोत तिथे स्वतःला खंबीर आणि आरामदायी बनवले आहे.

४. आम्ही चीनसमवेत संवादाच्या मार्गावर पुढे गेलो आहोत. भारत आणि चीन यांमधील चर्चेतून सर्व शंका दूर होतील.

५. भारताच्या ‘चिकन नेक’ (ईशान्य भारताला जोडणारा मार्ग) प्रदेशाजवळील बांगलादेशाच्या भागात पाकिस्तानी सैन्य आणि आय.एस्.आय. अधिकारी यांच्या उपस्थितीबद्दल चिंता आहे. भारतविरोधी घटकांना त्या भूमीचा वापर करून भारतात आतंकवादी पाठवता येणार नाहीत याची निश्चिती करावी लागेल.

६. आता परदेशातून आम्हाला शस्त्रे विकत मिळत आहेत; कारण आता शस्त्रास्त्र निर्मिती आस्थापनांना सहज परवाने मिळत आहेत आणि त्यांना सवलतीही मिळत आहेत. भारत नेहमीच प्रथम संवादाचा मार्ग शोधतो; परंतु जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा आम्ही युद्धापासून मागे हटणार नाही.

संपादकीय भूमिका

खोटारडे विधान करून भारतीय सैन्याला अपकीर्ती केल्यावरून राहुल गांधी यांच्यावर गुन्हा नोंद करून करून शिक्षा होण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे !