लव्‍ह जिहादसाठी होणारा कायदा राज्‍यघटना विरोधी असल्‍याची ‘मुस्‍लिम सत्‍यशोधक मंडळा’ची टीका

पुणे – धर्मांतर विरोधी कायदा असतांना लव्‍ह जिहाद हा नवा कायदा कशासाठी ? असा प्रश्‍न ‘मुस्‍लिम सत्‍यशोधक मंडळा’ने उपस्‍थित करून हा कायदा राज्‍यघटना विरोधी असल्‍याची टीका केली आहे. धर्मनिरपेक्ष समाज निर्मिती करण्‍यासाठी समान नागरी कायदा आल्‍यास मंडळ त्‍याचे स्‍वागत करेल, अशी भूमिका मुस्‍लिम सत्‍यशोधक मंडळाचे अध्‍यक्ष डॉक्‍टर शमसूद्दीन तांबोळी यांनी मांडली. धर्मांतर विरोधी कायदा हा राजकीय हेतू साध्‍य करण्‍यासाठी निर्माण केला जात असल्‍याचा आरोपही त्‍यांनी या वेळी केला. प्रलोभन दाखवून, धमकावून, फसवणूक करून, तसेच बळजोरीने केलेले धर्मांतर हे सध्‍याच्‍या कायद्यान्‍वये बेकायदेशीर आणि गुन्‍हेगारीचे वर्तन आहे. असे असतांना वेगळा धर्मांतर विरोधी कायदा कशासाठी ? असा प्रश्‍न उपस्‍थित करून लव्‍ह जिहादच्‍या नावाने अपप्रचार करून मुसलमान समाजाच्‍या विरोधात वातावरण तापवण्‍याचा प्रकार होत असल्‍याचे त्‍यांनी या वेळी म्‍हटले.

संपादकीय भूमिका

लव्‍ह जिहादच्‍या अनेक घटना घडलेल्‍या असतांना सत्‍यशोधक मंडळाच्‍या लोकांना सत्‍य दिसत नाही कि सत्‍य नाकारायचे आहे ?