अग्नीशमन यंत्रणा आणि साधनांअभावी वणवा विझवतांना झुडुपाच्या ओल्या फांद्या वापरल्या
सिंहगड (पुणे) – येथील घाट रस्त्यावरील जगताप माचीजवळील जंगलात १४ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता गडावरून खाली जाणार्या समाजकंटक पर्यटकांनी काडी लावून वणवा पेटवल्याचे वन विभागाच्या प्राथमिक अन्वेषणात निष्पन्न झाले. अडीच हेक्टर वनक्षेत्र आगीत भस्मसात् झाले. जंगलातील दुर्मिळ वृक्ष आणि मौल्यवान वनसंपत्ती नष्ट झाली. या महिन्यातील आगीची ही चौथी घटना आहे. (आगीच्या घटना वारंवार घडत असतांना त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासन का अपयशी ठरत आहे ? – संपादक) वणवा लागल्याची माहिती मिळताच सिंहगड वन विभागाचे परिमंडलाधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षारक्षकांनी जिवाची पर्वा न करता अंधारात डोंगराच्या दुर्गम भागात जाऊन वणवा आटोक्यात आणला. अग्नीशमन यंत्रणा आणि साधने उपलब्ध नसल्याने झुडपाच्या ओल्या फांद्यांचा वापर वणवा विझवण्यासाठी केला. (अग्नीशमन विभागाची ही स्थिती लज्जास्पद आहे ! – संपादक)
‘घेरा सिंहगड वन संरक्षण समिती’चे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले की, गडावरील पर्यटक, वाहनचालक यांच्याकडून वसूल केला जाणारा कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतांना वणवा विझवण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदी करण्यासाठी वन विभागाकडून संमती दिली जात नाही. (कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतांना आग विझवण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री का पुरवण्यात येत नाही ? याला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक) त्यामुळे वणवे विझवतांना सुरक्षारक्षकांना जीव धोक्यात घालून काम करावे लागते. (आग विझवतांना सुरक्षारक्षकांना दुखापत झाली किंवा जीव गमवावा लागला, तर वन विभाग त्याचे दायित्व घेणार का ? – संपादक)