
हिंदु संस्कृतीतील विचारधारा लक्षात घेतली असती, तर अशी उसनवारी करण्याचे कारण पडले नसते. मार्क्सच्या अर्थशास्त्राने संघर्ष नि अस्वास्थ्य यांना जन्म दिला, तर फ्राइडच्या लैंगिक संबंधावर आधारलेल्या कामशास्त्राने स्वैराचाराला समर्थन पुरवले. त्यांना आवरण्याच्या दृष्टीने गांधीजींचा राम अगदीच मवाळ ठरला.
इतका की, त्यांच्या मानसपुत्राच्या (जवाहरलाल नेहरू) स्त्रैणपणाने आणि साम्यवादाच्या आकर्षणाने हिंदुस्थानचे तुकडे पडले अन् हिंदुस्थानचे अर्थशास्त्र परकियांच्या दास्याला बांधले गेले. स्वराज्य प्राप्तीच्या ३० ते ३२ वर्षांनंतर आता हे आपल्याला थोडेथोडेसे उमगू लागले आहे; पण अजूनही आपले नेते भ्रामक विचारसरणीचा पूर्णपणे त्याग करू शकत नाहीत आणि अनुयायी असावे तितके कर्तव्यतत्पर रहात नाहीत. म्हणून गीतेचे तत्त्वज्ञान पुन्हा एकदा अत्यंत प्रभावीपणे समाजापुढे मांडले गेले पाहिजे. नेतृत्व कृष्णासारखे असले पाहिजे, जे पूर्ण निःस्वार्थी, ज्ञानविज्ञानसंपन्न, अत्यंत चतुर, लोकसंग्रही, अत्यंत निग्रही, दृढनिश्चयी असे आहे. यासह अनुयायीवर्ग पराक्रमी, निष्ठावंत, आज्ञाधारक, सामर्थ्यसंपन्न, कुशल आणि प्रयत्नशील असा असावा, म्हणजे श्री, यश, वैभव दुसरीकडे कुठे जाणार ?
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘जीवनसाधना’ ग्रंथ)