‘Islamic State’ Caliphate : ‘इस्लामिक स्टेट’ला पश्चिम आशियामध्ये खलिफाची राजवट स्थापन करायची आहे ! – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

न्यूयॉर्क – इस्लामिक स्टेट, अल्-कायदा यांसह इतर आतंकवादी संघटना बाह्य आतंकवादविरोधी दबावामुळे परिस्थिती लक्षात घेऊन कट रचत आहेत. या आतंकवादी संघटनांकडून निर्माण होणारा धोका अजूनही कायम आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या ३५ व्या अहवालात म्हटले आहे. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट’ (आय.एस्.आय.एल्.) या आतंकवादी गटाचे ध्येय पश्चिम आशियामध्ये खलिफाची राजवट (खिलाफत ) स्थापित करणे आहे. (खलिफा म्हणजे ‘उत्तराधिकारी’, ‘शासक’ किंवा ‘नेता’, जो शरीयतनुसार राज्य करतो.)

या अहवालानुसार ‘इस्लामिक स्टेट (दाएश)’ समर्थक ‘अल-जौहर मीडिया’ त्यांच्या ‘सीरत उल-हक’ प्रकाशनाच्या माध्यमातून भारतविरोधी प्रचार करत आहे. (या आतंकवादाची सर्वाधिक झळ बसलेल्या भारताने हा आतंकवाद निपटण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर हे सूत्र प्रकर्षाने मांडले आहे; मात्र संयुक्त राष्ट्रांसह इतर देशांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसत नाही ! – संपादक)  

१. या अहवालात म्हटले आहे की, अफगाणिस्तानात २४ हून अधिक आतंकवादी गट सक्रीय आहेत. अफगाणिस्तानातील या आतंकवादी संघटना अफगाणिस्तान, तसेच या प्रदेशातील इतर देश यांच्यासाठी धोका असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

२. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक आहे. इस्लामिक स्टेट-खोरासान केवळ देशासाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेशासाठी आणि त्यापलीकडेही धोका निर्माण करत आहे. अफगाणिस्तानला पुन्हा इतर देशांवर परिणाम करणार्‍या आतंकवादी कारवायांचे केंद्र बनण्यापासून रोखण्यासाठी सर्व सदस्य राष्ट्रांनी एकत्र यावे, असे आवाहन गुटेरेस यांनी केले आहे.

३. अफगाणिस्तानात सक्रीय असलेल्या ‘अल् कायदा’ने शेजारील देशांमध्ये त्याची  उपस्थिती वाढवण्यासाठी प्रादेशिक आतंकवादी संघटना, ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी), ‘इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान’, ‘ईस्टर्न तुर्किस्तान इस्लामिक मूव्हमेंट’ आणि ‘जमात अन्सारुल्ला’ यांच्याशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

४. भारतीय उपखंडात ‘टीटीपी’, अफगाण तालिबान आणि अल्-कायदा यांच्यातील सहकार्य वाढले आहे. ते ‘तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान’च्या बॅनरखाली आक्रमण करत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे .

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद्यांसाठी भारतीय म्हणजे हिंदू हे काफिर आहेत. त्यामुळे आतंकवाद्यांना भारताचे इस्लामिस्तान करायचे आहे. याविषयी जगभरातील आतंकवादी कट रचत असल्याची माहिती समोर येत असतांना भारत ही समस्या निपटण्यासाठी सिद्ध आहे का ?