Mob Attack On Jalgaon Police : संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर १५० हून अधिक ग्रामस्थांचे आक्रमण !

  • प्रत्युत्तरादाखल पोलिसांकडूनही हवेत गोळीबार !

  • २ अधिकारी आणि कर्मचारी घायाळ

  • हवालदाराचे अपहरण आणि सुटका

जळगाव – मध्यप्रदेशाच्या सीमेवरील उमर्टी गावाजवळ संशयित आरोपी पप्पी सिंह याला पकडण्यासाठी चोपडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी गेले होते. त्या वेळी त्यांच्यावर १५० हून अधिक ग्रामस्थांनी मोठे आक्रमण केले. ग्रामस्थांनी हवेत गोळीबार केला, तेव्हा पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल हवेत गोळ्या झाडल्या. या आक्रमणात २ अधिकारी आणि कर्मचारी घायाळ झाले असून अपहृत पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांची सुटका करण्यात आली आहे. जमावाने त्यांचे अपहरण केले होते. (पोलिसांचेच अपहरण होत असेल, तर सामान्यांच्या सुरक्षेचे दायित्व कोण घेणार ? – संपादक) उमर्टी गावात बेकायदेशीररित्या देशी कट्टा (बंदूक) बनवली जाते. तेथे पोलिसांकडून बनावट ग्राहक पाठवून निश्चिती करण्यात आली होती. देशी कट्टा बनवणार्‍या गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलीस गेले होते. घडलेल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे, तर एकाला अटक करण्यात आली आहे.

अपहरण झालेल्या पोलीस कर्मचार्‍याने सांगितली घटना !

पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी म्हणाले, ‘‘मला जमावाने दुचाकीवर बसून जंगलात नेले. ‘आमच्या माणसाला सोडा, नंतर तुला सोडतो’, असे मला भ्रमणभाषवर सांगायला लावले. मी ‘आरोपीला सोडू नका, माझ्या जिवाची पर्वा करू नका’, असे मी पोलिसांना सांगितले. आरोपींनी माझ्यावर डाव्या बाजूने गोळीबार करून मला घाबवरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही मला ठार मारू शकता; परंतु त्यानंतर तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील.’’ मध्यप्रदेश पोलिसांनी घटनास्थळी पोचून माझी सुटका केली. मी जवळपास १-२ घंटे आरोपींच्या कह्यात होतो. पप्पी सिंह याच्यासोबत १०० मुले काम करतात. त्याची यंत्रणा अनेक राज्यांत कार्यरत आहे. तो हत्यारांची विक्री करतो.’’

(सौजन्य : Lokshahi Marathi)

संपादकीय भूमिका

इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांवर आक्रमण होते, याचाच अर्थ पोलिसांचा धाकच उरलेला नाही, हे लक्षात येते. हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?