विकट भगत अखेर दोषी : ८ वर्षांनी निकाल

आयरिश युवती डॅनियल हत्या प्रकरण

मडगाव, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – मडगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांनी आयरिश बॅकपॅकर डॅनियल मॅकलॉग्लीन (वय २८ वर्षे) हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी संशयित विकट भगत याला १४ फेब्रुवारी या दोषी ठरवले आहे. या प्रकरणी १७ फेब्रुवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. बलात्कार करणे, हत्या करणे आणि पुरावे नष्ट करणे, या आरोपांखाली संशयित विकट भगत याला दोषी ठरवण्यात आले आहे. बॅकपॅकर डॅनियल मॅकलॉग्लीन हत्या आणि बलात्कार खटल्याचा निकाल १३ फेब्रुवारी या दिवशी लागणार होता; मात्र या दिवशी न्यायालयाचे कामकाज अर्ध्या दिवसाचे असल्याने हा निवाडा शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळी डॅनियलचे कुटुंबीय उपस्थित होते.

आयरिश युवती डॅनियल फेब्रुवारी २०१७ मध्ये एका मित्रासमवेत सुटीसाठी गोव्यात आली होती. मार्च २०१७ मध्ये दक्षिण गोव्यात काणकोण येथील पाळोळे किनार्‍याजवळील एका शेतात तिचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. तिचा चेहरा आणि डोके यांवर जखमा होत्या. हत्येच्या आदल्या दिवशी तिने समुद्रकिनार्‍यावरील एका होळी पार्टीला उपस्थिती लावली होती. गोवा पोलिसांनी या प्रकरणी संशयित विकट भगत याला कह्यात घेतले आणि त्यानंतर अन्वेषणात विकट भगत याने डॅनियल हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवल्यानंतर शिक्षा सुनावण्यासंदर्भात झालेल्या युक्तीवादाच्या वेळी सरकारी अधिवक्त्यांनी ‘आरोपीने केलेला गुन्हा अतीगंभीर असल्याने, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी’, अशी विनंती केली. आरोपीचे अधिवक्ता अरुण ब्रास डिसा यांनी ‘आरोपीच्या विरोधात कुठलाही पुरावा नसल्याने, त्याची नोंद घेऊन कमीतकमी शिक्षा द्यावी’, अशी मागणी केली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेऊन न्यायाधीश क्षमा जोशी १७ फेब्रुवारी या दिवशी शिक्षा सुनावणार आहेत. निवाड्यानंतर डॅनियलच्या कुटुंबियांना हुंदका आवरणे कठीण झाले. त्यांनी साश्रू नयनांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, अखेर ८ वर्षांच्या संघर्षानंतर आणि न्यायालयीन लढाईनंतर आम्हाला न्याय मिळाला आहे.