व्यसनांचे दुष्परिणाम समाजाला पटवून दिले पाहिजेत ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर

ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर

सातारा, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेतून युवकांची होणारी हानी भरून न येणारी आहे. याविषयी संघटित शक्ती निर्माण करून व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम शासन आणि समाज यांना पटवून दिले पाहिजेत, असे आवाहन ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले.

‘व्यसनमुक्त युवक संघा’च्या माध्यमातून फलटण (सातारा) येथील पिंपरद येथे आयोजित राज्यस्तरीय संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्रातील विविध व्यसनमुक्तीसाठी कार्य करणार्‍या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ह.भ.प. कराडकर पुढे म्हणाले की, शासन व्यसनमुक्तीविषयी उदासीन आहे; मात्र प्रतिदिन नवनवीन अध्यादेश काढून मद्यासह व्यसनी पदार्थ सहज कसे उपलब्ध होतील ? यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या संस्थांनी समन्वय साधला, तर राज्यात आणि देशातील युवकांच्या व्यसनाधीनतेचे प्रमाण निश्चितच घटेल, असा आम्हाला विश्वास आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘व्यसनमुक्त युवक संघा’चे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी केले. संवाद मेळाव्याचे सूत्रसंचालन जगन्नाथ शिंदे यांनी, तर आभारप्रदर्शन संघाचे राज्याध्यक्ष दीपक जाधव यांनी केले.