थोडक्यात महत्त्वाचे : धारातीर्थ मोहिमेची रायगडावर सांगता; कुत्र्याच्या आक्रमणात २ महिला घायाळ

धारातीर्थ मोहिमेची रायगडावर सांगता

रायगड – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या धारातीर्थ मोहिमेची सांगता ११ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर झाली. लाखो धारकरी या वेळी पू. गुरुजींचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जमले होते.


कुत्र्याच्या आक्रमणात २ महिला घायाळ

उल्हासनगर – कँप क्र. १ येथे १० जानेवारीला ९ ते १२ या वेळेत पिसाळलेल्या कुत्र्याने एकूण २२ जणांवर आक्रमण केले. यात २ महिला गंभीर घायाळ झाल्या. कुत्र्याने त्यांच्या पायाचे लचके तोडले. या आक्रमणात एका महिलेच्या पायाचे हाडही मोडले आहे. या कुत्र्याने आठवड्याभरात अनेकांवर आक्रमण केले आहे. ‘कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिकेत कुत्रे सोडू’, असे या संदर्भात मनसेने म्हटले आहे.


पालघर येथील पाटबंधारे प्रकल्पाच्या खर्चास मान्यता

पालघर – येथील मौजे सुकसाळे मधील देहरजी नदीवरील मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ सहस्र ५९९ कोटी १५ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. हा अतिरिक्त खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम्.एम्.आर्.डी.ए.) करणार आहे. ९५.६० द.ल.घ.मी. क्षमतेचा हा प्रकल्प माती आणि संधानकातील संयुक्त धरण प्रकल्प असणार आहे. यातून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी ६९.४२ द.ल.घ.मी. पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असणार आहे.


मुंबईत फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग !

 

मुंबई – जोगेश्वरीजवळील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली. हे गोदाम फर्निचरचे असल्याने आग झपाट्याने पसरली. अग्निशमन विभागाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न चालू होते.


मंत्रालयात चेहरा ओळखता न आलेल्यांची फेरनोंदणी होणार !

मुंबई – मंत्रालय प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या ‘फेस डिटेक्शन’वर (चेहरा ओळखणे) आधारित ‘एफ्.आर्.एस्.’ तंत्रज्ञानामुळे सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, म्हणजे सर्वांचाच प्रवेश सुलभ होईल. चेहरा ओळखता न आल्यास मंत्रालय प्रवेशास विलंब किंवा अडथळा होत असल्यास अशा सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या अद्ययावत् छायाचित्रासह फेरनोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.