|
कासगंज (उत्तरप्रदेश) – कासगंजमधील सराय जुन्नारदार गावात हिंदु ग्रामस्थांनी ‘विक्रीसाठी घर’ असे लिहिलेले फलक घराबाहेर लावले होते. ‘या वेळी होळीचा सण साजरा करू नये’, असेही त्यांनी म्हटले होते. हिंदूंना गावात एका नियोजित ठिकाणी होळी पेटवण्याची अनुमती हवी होती. हे ठिकाण एका मशिदीजवळ आहे. मुसलमान लोक याला विरोध करत होते. हिंदूंनीही या संदर्भात निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी हा वाद मिटवला.
१. हे गाव मुसलमानबहुसंख्य असलेले आहे. गावात काही हिंदु कुटुंबेही रहातात. गावातील एखाद्या ठिकाणी होळी पेटवण्याची मागणी करण्यासाठी हिंदूंनी निदर्शने केली. ज्या ठिकाणाची हिंदूंनी मागणी केली होती, ते पारंपरिक ठिकाण आहे. गेल्या अनेक दशकांपासून येथे होलिका दहन होत आहे.
२. स्थानिक पत्रकार आयुष भारद्वाज यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात मुसलमानांनी होळी पेटवलेल्या ठिकाणाजवळ एक मशीद बांधली होती. मशिदीच्या बांधकामानंतर होळीची जागा गावाबाहेर हालवण्यात आली. ही परिस्थिती काही वर्षे कायम राहिली. आता या नवीन ठिकाणी अंगणवाडी बांधण्यात आली आहे.
३. हिंदूंनी म्हटले, ‘आम्ही होलिका दहनाचे स्थान वारंवार पालटू शकत नाही. गावातील मशिदीजवळील ठिकाणी होलिका दहन करण्याची अनुमती पुन्हा देण्यात यावी.’ या मागणीच्या संदर्भात निदर्शने करण्यात आली असून प्रशासनाला ही समस्या सोडवण्याची विनंती करण्यात आली आहे. जर पारंपरिक ठिकाणी होलिका दहन करण्यास अनुमती दिली नाही, तर ते यावर्षी होळी साजरी करणार नाहीत आणि त्यांचे घर अन् गावही सोडतील.
४. दुसरीकडे मुसलमान मशिदीसमोरील ठिकाणी होलिका दहन करू नये, यावर अडून बसले होते. प्रशासनाने या प्रकरणात चर्चा केली. त्यानंतर हिंदु पक्षाला ग्रामपंचायतीच्या जागेवर होळी पेटवण्याची अनुमती देण्यात आली. महिला पोलीस अधिकारी आंचल चौहान यांनी सांगितले की, गावात लावलेले फलक हिंदूंनी काढून टाकले आहेत आणि सध्या शांतता आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंना अशी चेतावणी देऊ लागू नये, असेच अन्य हिंदूंना वाटते ! |