
मुंबई – राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्यावर असलेले आरोप मान्य करून करूणा मुंडे यांना दरमहा १ लाख २५ सहस्र रुपये पोटगी आणि लग्न होईपर्यंत मुलीला ७५ सहस्र देण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून ‘करूणा मुंडे यांनी न्यायालयात खटला जिंकल्याविषयी मी त्यांचे अभिनंदन करते. करूणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असून त्यांना देखभाल व्यय देण्यात यावा आणि त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत.’ असे म्हटले आहे.
आर्थिक निकषांवर आधारित आदेश ! – मुंडे यांचे वकील
करूणा शर्मा यांनी २०२२ मध्ये घरगुती हिंसाचार कायद्याच्या अंतर्गत धनंजय मुंडे यांच्यावर पोटगीची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. आदेश केवळ आर्थिक निकषांवर आधारित आहेत. मुंडे यांनी स्वत: त्यांच्यासमवेत संबंध असल्याचे मान्य केले होते. याचा आधार घेण्यात आला आहे.