चीन आणि अमेरिका यांच्यात ‘एआय’ स्पर्धेची शक्यता
चीनच्या हाँगजाऊ स्थित ‘डीपसीक’ नावाच्या ‘स्टार्टअप’ने (नवउद्योगाने) मागील आठवड्यात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (‘आर्टीफिशियल इंटेलीजिन्स’च्या) क्षेत्रात वादळ निर्माण करून अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला आहे. ‘डीपसीक एआय’ने डिसेंबरमध्ये स्वतःचे ‘व्ही३ मॉडेल’ (प्रणाली), तसेच जानेवारीमध्ये ‘आर्१’ आणि ‘Janus-Pro-7B’ हे मॉडेल सादर केले. सर्वसामान्यांना वापरण्यासाठी उपलब्ध असणारे ‘आर्१’ मॉडेल सादर झाल्यापासून एका आठवड्याच्या आत अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, चीन येथील पल चार्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले, म्हणजेच सिलिकॉन व्हॅलीमधील सर्व ‘एआय’ कंपन्यांना मागे सोडत ‘डीपसीक’ प्रथम स्थानावर विराजमान झाले. या घटनेमुळे केवळ सिलिकॉन व्हॅली नव्हे, तर वॉल स्ट्रीट एक्सचेंज (शेअर बाजार)सुद्धा हादरला. सिलिकॉन व्हॅलीमधील ‘गोल्डन बेबी एन्व्हीडिया’ कंपनीचे शेअर एका रात्रीत ५९३ बिलियन डॉलरने (५१ लाख ९२ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) कोसळले. वॉल स्ट्रीटच्या इतिहासात एखाद्या कंपनीला एका दिवसात एवढा मोठा तोटा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (जगातील ५ वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणार्या भारताकडे एकूण विदेशी मुद्रा भांडार ६२३ बिलियन डॉलर (५४ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) आहे. यावरून ५९३ बिलीयन डॉलर किती मोठी संख्या आहे, याची वाचकांना कल्पना येईल.)

१. अमेरिकेला धक्का का बसला ?
‘डीपसीक’च्या यशामुळे ‘एन्व्हीडिया’ ही मायक्रोचिप बनवणारी कंपनी, सिलिकॉन व्हॅली आणि पर्यायाने अमेरिकेला धक्का का बसला ? एकेकाळी उर्जा आणि अवकाश संशोधन क्षेत्रांत अग्रेसर असणारा देश जागतिक महाशक्ती म्हणून ओळखला जाईल अन् जगाचे नेतृत्व करील, असा समज होता. आता ती जागा कृत्रिम बुद्धीमत्तेने (‘एआय’ने) घेतली आहे. स्वतःचा जागतिक दबदबा कायम ठेवण्यासाठी अमेरिकन सरकारने सिलिकॉन व्हॅलीमधील आपल्या माहिती-तंत्रज्ञान आस्थापनांना ‘एआय’चे महत्त्व ओळखून प्रोत्साहन देण्यास प्रारंभ केला. भविष्याची पावले ओळखून ‘गूगल’, ‘एन्व्हीडिया’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘मेटा’, ‘ओपन एआय’ यांसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी अवाढव्य गुंतवणूक केली; परंतु ‘डीपसीक एआय’ने ६ मिलियन डॉलरपेक्षाही न्यून व्ययात ‘आर्१’ मॉडेल सादर केले. ‘एआय’ क्षेत्रात काम करणार्या अमेरिकन तंत्रज्ञान आस्थापनांच्या संशोधन आणि निर्मिती व्ययाच्या तुलनेत हा व्यय अत्यल्प आहे. एवढ्या अल्प व्ययात अत्यंत प्रभावी ‘एआय’ निर्मितीमुळे अत्यंत खर्चिक अमेरिकन ‘एआय’ उद्योग धोक्यात येईल, या भीतीने गुंतवणूकदारांनी अमेरिकन तंत्रज्ञान आस्थापनांच्या समभागाची तडकाफडकी विक्री करणे चालू केले. यामुळे मायक्रोचिप बनवणारी कंपनी ‘ब्रॉडकॉम’चे समभाग १७.४ टक्के, ‘एन्व्हीडिया’ या मायक्रोचिप बनवणार्या कंपनीचे समभाग १७ टक्के, ‘चॅटजीपीटी बेकर मायक्रोसॉफ्ट’ २.१ टक्के, ‘गूगल’ची पालक कंपनी ‘अल्फाबेट’चे समभाग ४.२ टक्क्यांनी कोसळले. याच्या परिणामस्वरूपी जगभरातील गुंतवणूक बाजारातील अनुमाने १ ट्रिलीयन डॉलर (एकावर १२ शून्य) रक्कम स्वाहा झाली, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
२. ‘डीपसीक’ काय आहे ?
‘डीपसीक’ ही हाँगजाऊ स्थित चिनी ‘स्टार्टअप’ आहे. या ‘स्टार्टअप’च्या मोठ्या भागाची मालकी लीआंग वेनफेंग यांच्या मालकीची आहे. लिआंग वेनफेंग हे ‘क्वांटिटेटिव्ह हेज फंड हाय-फ्लाययर’चेही सहसंस्थापक आहेत. (‘क्वांटिटेटिव्ह हेज फंड’ ज्याला ‘क्वांट फंड’ असेही म्हणतात, हा एक प्रकारचा ‘हेज फंड’ आहे, जो बाजारात व्यापार संधी ओळखण्यासाठी प्रगत गणिती प्रणाली, सांख्यिकीय विश्लेषण आणि संगणक ‘अल्गोरिदम’ (एखादे काम करण्याची टप्प्याटप्प्यागणिक असलेली कार्यसूची) वापरतो, तसेच गुंतवणूकीचे निर्णय घेण्यासाठी मानवी अंतर्ज्ञानाच्या ऐवजी माहितीचलित धोरणांवर अधिक अवलंबून असतो.) ‘डीपसीक एआय’चे अत्यल्प व्ययात सिद्ध झालेले ‘व्ही३’ (लार्ज लँग्वेज मॉडेल – महाभाषा समीकरण संच) मॉडेल डिसेंबर २०२४ मध्ये सादर करण्यात आले. त्यानंतर अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांनी स्थापित केलेली अनेक मानके मोडीत काढून प्रसिद्धी झोतात आले. ‘आर्१ लँग्वेज मॉडेल’, जे मानवी तर्कांच्या पैलूंची नक्कल करते, त्याने विविध मानकांमध्ये ‘ओपन एआय’च्या नवीनतम ‘ओ१’ मॉडेलप्रमाणेच काम केले आणि त्यास मागेही टाकले.
‘डीपसीक’च्या संशोधकांनी ‘व्ही३’ मॉडेलने ‘एन्व्हीडिया एच् ८००’ या चिप्सचा उपयोग केला, तसेच ६ मिलियन डॉलरपेक्षा न्यून व्यय केला. ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘मेटा’ आणि ‘ओपन एआय’ यांसारख्या अब्जावधी ‘एआय’ दिग्गजांच्या तुलनेत ही किरकोळ रक्कम आहे. एवढी रक्कम या अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्या एका वर्षात व्यय करतात. ‘डीपसीक’ने एका संशोधन पत्रात अमेरिकेच्या प्रगत ‘एआय चिप्स’च्या निर्यातीवर अंकुश ठेवण्याच्या धोरणावर ताशेरे ओढले आणि अशी शक्यता व्यक्त केली की, ‘डीपसीक’च्या यशामुळे ‘ओपन एआय’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘गूगल’, ‘मेटा’ यांचा वापर मर्यादित होईल अन् त्यांचे बाजारमूल्यही न्यून होईल.
३. चीन आणि अमेरिका यांच्यासाठी ‘स्पुटनिक मोमेंट’
‘स्पुटनिक मोमेंट’ हा शब्द व्यापक अर्थाने अशी स्थिती दर्शवण्यासाठी वापरला जातो, जेथे एखादा देश अथवा संघटन यांच्या लक्षात येते की, जलदगतीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ४ ऑक्टोबर १९५७ या दिवशी तात्कालीन सोव्हिएत रशियाने अवकाशात कृत्रिम उपग्रह यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत सोडला. या घटनेने अमेरिकेला विज्ञान तंत्रज्ञानाविषयी ‘जागतिक महाशक्ती’ असण्याच्या विश्वासाला धक्का दिला. या घटनेपर्यंत सोव्हिएत रशिया तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेपेक्षा पिछाडीवर असल्याचे गृहीत धरले जात होते; परंतु ‘स्पुटनिक’च्या यशस्वी उड्डाणाने अमेरिकेला वास्तविकतेचे भान आले. त्या क्षणापासून अमेरिका अवकाश तंत्रज्ञानाविषयी रशियाच्या बरोबरीने येण्यासाठी किंबहुना त्याच्याही पुढे जाण्यासाठी अधिक जोरकसपणे प्रयत्न करू लागला.
‘डीपसीक एआय’चे यश हे अमेरिकेसाठी दुसरा ‘स्पुटनिक मोमेंट’ असू शकतो. अमेरिकेच्या तंत्रज्ञान उद्योगक्षेत्राला हादरवणार्या या क्षणापासून चीन आणि अमेरिका यांच्यात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात शीतयुद्ध काळात अमेरिका अन् रशिया यांच्यात जशी स्पर्धा होती, तशी स्पर्धा निर्माण होऊ शकते.
४. वर्चस्वाची लढाई
मानवी जगाला कवेत घेऊ पहाणारे ‘एआय’चे क्षेत्र आता चीन आणि अमेरिका यांच्यासाठी वर्चस्वाची लढाई लढण्याचे मैदान ठरेल, याची चाहूल लागत आहे. जर चीन ‘एआय’ क्षेत्रात स्वावलंबी झाला, तर त्याचे ‘गूगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘ओपन एआय’ यांवरील अवलंबित्व घटेल; पर्यायाने अमेरिकेवरील अवलंबित्व घटेल. या वर्चस्वाच्या लढाईत अग्रेसर रहाण्यासाठी अमेरिका ‘एआय’साठी आवश्यक मायक्रोचिपच्या निर्यातीवरील बंधने अधिक कडक करील, असे दिसते आहे, जेणेकरून चीनची ‘एआय’च्या क्षेत्रातील प्रगती ‘मायक्रोचिप’च्या अभावी सावकाश होईल. (अमेरिकेने याआधीच ‘एन्व्हिडीया’च्या आधुनिक अशा ‘जीपीयू ए१००’ आणि ‘जीपीयू एच्१००’ यांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.)
चीन ‘एआय’ क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या मायक्रोचिप निर्यातीच्या बंदीनंतर चीनचे प्रयत्न स्वावलंबी होण्यासह तंत्रज्ञानाविषयी स्वयंपूर्ण होण्याचे आहेत. यामुळे ‘एआय’ क्षेत्रात शीतयुद्ध चालू होऊ शकते आणि चीन अन् अमेरिका स्वतंत्रपणे ‘एआय इकोसिस्टम’ (कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित यंत्रणा) विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.
५. भू-राजनैतिक परिणाम
जर ‘डीपसीक एआय’ने सिलिकॉन व्हॅलीचे वर्चस्व मोडून काढले, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेकडून चीनकडे नेतृत्व पालट होत आहे, हे स्पष्ट होईल. आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य यांमध्ये ‘एआय’ हा एक महत्त्वाचा घटक आहे अन् या क्षेत्रातील वर्चस्व चीनच्या भू-राजकीय प्रभावाला बळ देईल, तसेच ‘तांत्रिक महासत्ता’ म्हणून त्याचे स्थान अधिक मजबूत होईल. चीनने त्याच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिटिव्ह’ प्रकल्पाच्या (आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडातील विविध देशांना जोडणारा प्रकल्प) अंतर्गत ‘एआय’चा ‘डिजिटल सिल्क रोड’ उपक्रमात समावेश केला आहे. ‘एआय’च्या क्षेत्रात लक्षणीयरित्या प्रगती केल्यास चीन हा आफ्रिका, दक्षिण आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील ‘एआय’ आधारित पायाभूत सुविधा प्रकल्पांना बळकट करू शकतो अन् डिजिटल वर्चस्व वाढवू शकते.
संरक्षण प्रणाली, सायबर सुरक्षा आणि स्वायत्त शस्त्रे यांमध्ये ‘एआय’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जर ‘एआय’च्या क्षेत्रात चीन तांत्रिकदृष्ट्या अधिक उन्नत झाला, तर त्यामुळे बीजिंगची लष्करी क्षमता वाढू शकते आणि सत्ता समतोल बिघडू शकतो, विशेषत: दक्षिण आशिया अन् इंडो-पॅसिफिकमध्ये जिथे चीनचा आडमुठेपणा आधीच भारत, अमेरिका, तसेच इतर राष्ट्रांसाठी चिंतेचा विषय आहे.
– प्रा. शरद पाटील, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, जळगाव. (३.२.२०२५)
चीनच्या संवेदनशील इतिहासाविषयी ‘डीपसीक एआय’ अविश्वासार्ह
‘डीपसीक एआय’ने तूर्तास सिलिकॉन व्हॅलीला चितपट केले असले, तरी या चिनी स्टार्टअपविषयी काही आक्षेपही नोंदवले गेले आहेत. पारदर्शकता, नैतिकता आणि लोकशाही मूल्यांवर भर देणार्या ‘एआय’च्या मानदंडांना आकार देण्यात सिलिकॉन व्हॅलीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे; परंतु बीजिंग मात्र ‘डीपसीक एआय’द्वारे त्यांच्या हितसंबंधांना अनुकूल, राज्य नियंत्रित आणि केंद्रीकृत ‘एआय’ नियमनाला अनुकूल मॉडेल विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे जसे, चीनच्या संवेदनशील इतिहासावर ‘डीपसीक’ मौन बाळगतो. असे काही प्रश्न आहेत की, जे विचारल्यावर हे ‘डीपसीक एआय’ उत्तरे देण्यास सोयीस्करपणे असमर्थ ठरते जसे –
अ. ४ जून १९८५ या दिवशी तिआनमेन चौकात काय घडले ?
आ. हु जिंताओ यांच्याविषयी वर्ष २०२२ मध्ये काय घडले ?
इ. शी जिनपिंग यांची तुलना विनी-द-पु या कार्टून पात्राशी का केली जाते ?
ई. अम्ब्रेला क्रांती काय आहे ?
अशा प्रश्नांची उत्तरे ‘डीपसीक एआय’ देत नाही, तसेच इंडो-पॅसिफिक प्रांत, दलाई लामा, तिबेट यांच्याविषयी प्रश्न विचारल्यास ‘डीपसीक एआय’ चीन सरकारची अधिकृत भूमिका मांडतो, म्हणजे माहितीवरील नियंत्रण ‘डीपसीक एआय’ करतो. यास्तव पारदर्शी इंटरनेट व्यवहाराविषयी ‘डीपसीक एआय’ विश्वासार्ह नाही.
– प्रा. शरद पाटील