डिचोली पोलीस ठाण्यातील महिला हवालदाराकडून १७ लाख रुपयांची अफरातफर : सेवेतून निलंबित

पणजी, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – डिचोली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार पूजा गावस यांना १७ लाख ३० सहस्र रुपयांची अफरातफर केल्याच्या प्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अफरातफर केलेली सर्व रक्कम पोलीस हवालदार पूजा गावस हिच्याकडून वसूल करण्यात आली आहे आणि या प्रकरणी पोलीस अन्वेषण चालू आहे. अन्वेषणानंतर येणार्‍या माहितीच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

असा आला गैरव्यवहार उघडकीस !

डिचोली पोलीस नियमितपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करतात. कारवाईनंतर संबंधित वाहनचालकांकडून दंड स्वरूपात वसूल करण्यात आलेली रक्कम डिचोली पोलीस ठाण्यात नियुक्त केलेल्या महिला पोलीस हवालदाराकडे जमा केली जाते आणि संबंधित महिला पोलीस हवालदाराने ही रक्कम खात्याच्या अधिकोषाच्या खात्यामध्ये जमा करायची, अशी कार्यपद्धत आहे. पोलीस हवालदार पूजा गावस हिने तिच्याकडे आलेले अर्धे पैसे जमा केलेच नाहीत. कार्यपद्धतीनुसार दिवसभरात दिलेल्या चलनाची माहिती थेट आल्तिनो, पणजी येथील वाहतूक पोलीस मुख्यालयात जात होती. त्यानुसार दिवसाकाठी चलनाच्या रूपात डिचोली पोलीस ठाण्यामध्ये किती रक्कम गोळा झाली, याची माहिती मुख्यालयाला मिळत होती. ज्या वेळी डिचोली पोलीस ठाण्याने जमा केलेले संपूर्ण चलन आणि त्या स्वरूपातील पैसे यांचा हिशेब पोलीस मुख्यालयाने पडताळून पाहिला, त्या वेळी एकूण चलनाचे पैसे सुमारे २५ लाख रुपयांपर्यंत पोचत होते; मात्र पोलीस खात्याच्या अधिकोषाच्या खात्यामध्ये केवळ १२ लाख ५० सहस्र रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आले. हे प्रकरण उघडकीस येताच खात्यात खळबळ माजली. या काळात डिचोली पोलीस ठाण्यात हे सर्व व्यवहार कोण बघत आहे ? याचे अन्वेषण करण्यात आले आणि या वेळी संबंधित महिला पोलीस हवालदाराचे नाव समोर आले. संबंधित महिला हवालदाराने प्रारंभी या प्रकरणात तिचा सहभाग नसल्याचे म्हटले; मात्र नंतर तिने स्वीकृती देऊन सर्व पैसे अधिकोषाच्या खात्यात जमा करण्याची हमी दिली. हे प्रकरण खात्याच्या अंतर्गत असल्याने खात्याची अपकीर्ती होऊ नये, यासाठी हे प्रकरण प्रारंभी दाबून ठेवण्यात आले होते; मात्र ते नंतर बाहेर पडले. हे प्रकरण डिसेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडले.

संपादकीय भूमिका

‘कुंपणच शेत खाते’, ही म्हण सार्थ ठरवणारी महिला पोलीस हवालदार !