‘ऑक्टोबर २०२४ मध्ये सद्गुरु राजेंद्र शिंदे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. तेव्हा त्यांनी मला प्रसादाची २ पाकिटे दिली होती. मी ती पाकिटे न उघडता माझ्या हातात धरली होती. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी दिलेली प्रसादाची पाकिटे हातात धरल्यावर आलेल्या अनुभूती
अ. ‘सद्गुरु राजेंद्रदादांनी मला प्रसाद म्हणून दिलेली २ पाकिटे, म्हणजे मला ‘त्यांनी दुप्पट आशीर्वाद दिले’, असे वाटले.
आ. सद्गुरु दादांच्या हस्तस्पर्शाने आणि त्यांच्यातील चैतन्याने ती पाकिटे भारित झाली होती. मी ती पाकिटे हातात घेतल्यापासून अनुमाने १ घंटा माझ्या तळहातावर वेगवेगळी आल्हाददायक स्पंदने जाणवत होती.
इ. मी ती पाकिटे माझ्या तळहातात घेतल्यावर माझ्या हाताला हलकेपणा जाणवला आणि ‘मी जणू काही मोठ्या आकाराचे फूल तळहातात धरले आहे’, असे मला जाणवले.

ई. फुलपाखराने त्याचे दोन्ही पंख जवळ घेऊन नंतर दोन्ही पंख उघडल्यावर जशी स्पंदने येतात, तशी स्पंदने मी माझ्या तळहातावर अनुभवली. त्या वेळी माझ्या मनाला आनंद जाणवत होता.
उ. माझ्या हातात प्रसादाची पाकिटे असतांना मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची आर्ततेने आठवण येत होती.
ऊ. ती पाकिटे मी माझ्या हातात धरल्यावर ‘मी शुभ्र प्रकाश प्रक्षेपित करणारा तळहाताच्या आकाराएवढा गोळा धरला आहे’, असे मला जाणवत होते.
ए. ‘ती प्रसादाची पाकिटे हातात तशीच धरून ठेवावी’, असे मला वाटत होते; पण एका सेवेसाठी जातांना मला ती पाकिटे बाजूला ठेवावी लागली. त्यानंतरही मला त्या तळहातावर तशीच स्पंदने अनुभवता येत होती. ही सद्गुरु दादांची माझ्यावरील कृपा होती.
२. सद्गुरु दादांच्या हस्तस्पर्शाने भारित झालेला डबा हातात घेतल्यावर दिवसभर आनंददायी स्पंदने जाणवणे
एकदा सद्गुरु दादांनी मला त्यांनी वापरलेला एक प्लास्टिकचा डबा आश्रमात जमा करण्यासाठी दिला होता. सद्गुरु दादांच्या हस्तस्पर्शाने भारित झालेला डबा मी माझ्या हातात घेतल्यावर मला वरील प्रमाणेच आनंददायी स्पंदने संपूर्ण दिवसभर जाणवत होती.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घडवलेल्या सद्गुरूंची कृपा मला अनुभवता आली’, याबद्दल मी सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि कृपाळू सच्चिदानंद गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. गीता व्हटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |