कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक लाभांपासून वंचित ठेवणारी प्रसारमाध्यमे !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

कुंभमेळा हा हिंदु धर्मातील सर्वांत मोठा आणि भव्य उत्सव आहे. येथे लक्षावधी नव्हे, तर कोट्यवधी भक्त येतात. हा एक आध्यात्मिक संघटनाचा सोहळा आहे, जिथे विविध मार्गांनी साधना करणार्‍या लोकांना एकत्र पहाण्याची सुवर्णसंधी असते. त्यांच्याकडून अध्यात्म शिकण्याची आणि त्यांच्या पद्धती अनुकरण करण्याची संधी मिळते; परंतु अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमे काही व्यक्तींना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन लोकांचे लक्ष कुंभमेळ्यापासून दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत.

विशेषतः काही प्रसारमाध्यमे अशा प्रसिद्ध झालेल्या युवक-युवतींना शोधून त्यांच्या संदर्भात बातम्या सिद्ध करतात आणि चर्चांना चालना देतात.

१. कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक महत्त्वाऐवजी माध्यमांचे मोह-मायेविषयी चर्वितचर्वण

याचे ताजे उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यात ‘आयआयटी बाबा’ नावाची एक व्यक्ती भेटली. ‘ते ‘आयआयटी’चे पदवीधर आहेत’, असे सांगून त्यांना प्रचंड ‘व्हायरल’ (प्रसारित) करण्यात आले. त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, त्यांच्या सहकार्‍यांशी संवाद साधला गेला. ते कोणत्या आखाड्यात आहेत ?, त्यांच्या कुटुंबाविषयी विचारले गेले. कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक महत्त्वाऐवजी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसायला प्रारंभ केला. असेच आणखी एक उदाहरण साध्वी होणार्‍या हर्षा यांच्याशी संबंधित आहे. त्यांच्याविषयीही हाच प्रकार घडला. त्या पूर्वी कशा होत्या ?, त्या कसे कपडे घालत होत्या ? त्यांचे सौंदर्य, अशा प्रकारच्या बातम्या सिद्ध केल्या गेल्या.

कुंभमेळ्यात जपमाळा विकणारी ‘मोनालिसा’ नावाची एक युवती चर्चेत आहे. तिचे सौंदर्य, डोळे, हास्य आणि समाजमाध्यमांवरील ‘फॉलोअर्स’ यांविषयी प्रसारमाध्यमे अहोरात्र चर्चा करत आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याचा आध्यात्मिक लाभ घेण्याऐवजी माध्यमे मोह-माया, आसक्ती निर्माण करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.

श्री. चेतन हरिहर

२. पापाचा घडा भरत असलेली प्रसारमाध्यमे

प्रसारमाध्यमांनी काय प्रसारित करावे ? कोणत्या गोष्टींमुळे भारतीय जनतेला लाभ होईल ?, याचा विचार करून बातम्या प्रसारित केल्या, तर भारतीय संस्कृतीचे ऋण फेडले जाईल; पण दुर्दैवाने इतकी अनुभवसंपन्न प्रसारमाध्यमे लोकांना चुकीच्या दिशेने नेऊ लागली आहेत. ते जर जाणूनबुजून असे वागत राहिले, तर त्यांच्या कर्मांचे फळ त्यांना नक्कीच भोगावे लागेल.

हीच प्रसारमाध्यमे मक्का-मदिनेमध्ये जाऊन अशा प्रकारे युवक-युवतींची छायाचित्रे घेतात का ? किंवा इतर धर्मांच्या सणांमध्ये असे प्रकार करतात का ? जर तसे केले, तर काय होईल, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे ते अशा ठिकाणी नाक खुपसत नाहीत. भारत किती समृद्ध आहे, हे जगाला दाखवायचे असेल, तर प्रसारमाध्यमेच हे करू शकतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या माध्यमांनी स्वतःच्या  लोकप्रियतेसाठी देशाच्या प्रतिष्ठेला मलीन न करता भारताची प्रगती आणि संस्कृती यांचा गौरव करावा. विशेषतः कुंभमेळ्यात साधू-संतांची तपस्या, देवावरील त्यांची श्रद्धा आणि अध्यात्म यांचा महिमा दाखवावा. यामुळेच प्रसारमाध्यमांच्या व्यवसायाला खरा अर्थ प्राप्त होईल.

– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०२५)