Yogi Puranath Maharaj Nanded : विश्‍व हिंदु परिषद आणि सनातन संस्था यांचे कार्य एकच आहे !

नांदेड येथील योगी हिराजी महाराज सेवाश्रमाचे योगी पुरणनाथ महाराज यांचे आशीर्वचन

योगी पुरणनाथ महाराज (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना श्री. चेतन राजहंस

प्रयागराज (उत्तरप्रदेश), २७ जानेवारी (वार्ता.) – ज्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांनी बनलेल्या त्रिवेणी संगमात स्नान करून मुक्त होता येते, त्याचप्रमाणे ‘सनातन संस्थे’चे हे प्रदर्शन म्हणजे भक्तीयोग, ज्ञानयोग अन् कर्मयोग यांचा अपूर्व संगमच आहे, असा अनुभव मला येत आहे. विश्‍व हिंदु परिषद आणि सनातन संस्था यांचे कार्य एकच आहे, असे मार्गदर्शन नांदेड येथील योगी हिराजी महाराज सेवाश्रामाचे आणि विश्‍व हिंदु परिषदेचे अर्धापूर (महाराष्ट्र) येथील पालकमंत्री योगी पुरणनाथ महाराज यांनी येथे केले. २६ जानेवारी या दिवशी त्यांनी महाकुंभक्षेत्री सेक्टर १९ येथील सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पिंपरी चारळवाडी येथील श्री क्षेत्र माऊली संस्थानाचे तपोनिधी नारायण महाराजही उपस्थित होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दोघांचा सन्मान केला.

आम्ही प्रत्येक कार्यात सनातन संस्थेला सेवा रूपात अवश्य साहाय्य करू !

योगी पुरणनाथ महाराज म्हणाले, ‘‘चारही पुरुषार्थांची प्राप्ती प्रदान करून मोक्ष मिळेल अशा पद्धतीचे हे सनातनचे कार्य अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. आजच्या काळात बलोपासनेची पुष्कळ आवश्यकता आहे. बाल आणि युवक यांच्यावर हे सर्व धर्मसंस्कार करणे ही काळाची आवश्यकता आहे. हे प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आनंद झाला. या कार्याशी मी जोडलो गेलो आहे. या कार्यास पुष्कळ शुभेच्छा आणि शुभकामना देतो. सनातनचे हे धर्मप्रसार कार्य वाढत जावो. जेव्हा आम्हाला आमंत्रण येईल, त्या वेळी आम्ही प्रत्येक कार्यात सनातन संस्थेला सेवा रूपात अवश्य साहाय्य करू.’’