
१. सौ. मनीषा गायकवाड (पू. लोखंडेआजींची नात), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही’, याची शेवटपर्यंत काळजी घेणार्या पू. लोखंडेआजी ! : ‘आठवड्यातून एक दिवस मी पू. आजींच्या सेवेसाठी त्यांच्या निवासस्थानी थांबत असे आणि अन्य दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जात असे. ‘नियोजनानुसार १२.१२.२०२४ या दिवशी निवासस्थानी थांबण्याऐवजी १४.१२.२०२४ या दिवशी थांबूया’, असा विचार माझ्या मनात आला आणि मी तसे केले. १३.१२.२०२४ या दिवशी रात्री ८.२० वाजता पू. आजींनी देहत्याग केला. मी निवासस्थानी थांबल्यामुळे मला सर्व नातेवाइकांना निरोप देता आले, तसेच दुसर्या दिवशी पू. आजींच्या अंत्यविधीच्या संदर्भातील सेवा करता आल्या. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘निवासस्थानी थांबण्याचे नियोजन पालटण्याचा विचार ईश्वरानेच मला दिला होता.’
१ आ. देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे
१. खोलीतील वातावरण प्रकाशमय, आनंदमय आणि आल्हाददायक झाले होते.
२. मला शांती, स्थिरता आणि चैतन्य यांची अनुभूती येत होती.
३. मी रात्रभर जागरण करूनही मला कसलाच त्रास झाला नाही.’
२. सौ. सीमा संतोष अनारसे (पू. लोखंडेआजींची नात), जळगाव
२ अ. पू. आजींच्या देहत्यागानंतर त्यांनी जुन्या आठवणी काढून रडण्यापेक्षा श्रीकृष्णाचा श्लोक म्हणण्यास सूक्ष्मातून सांगणे : ‘पू. आजींनी देहत्याग केला, त्या वेळी मी अहिल्यानगर येथे होते. तेथून रामनाथी आश्रमात येण्यासाठी मी चारचाकीत गाडीत बसले. तेव्हा मला पू. आजींविषयीचे भूतकाळातील प्रसंग आठवले. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून पुष्कळ अश्रू येऊ लागले आणि मला त्रास होऊ लागला. तेव्हा पू. आजी मला सूक्ष्मातून म्हणाल्या, ‘माझ्या आठवणींमुळे तुला पुष्कळ त्रास होईल. त्याऐवजी तू ‘कृष्णाय वासुदेवाय…’ हा श्लोक म्हण.’ त्यानंतर मी सतत तो श्लोक म्हटला आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप केला.’
३. सौ. उर्मिला रामेश्वर भुकन (पू. लोखंडेआजींची नातसून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. पू. आजींना प्रार्थना केल्यावर आज्ञाचक्रातून चैतन्य आत जाऊन हलकेपणा जाणवणे : ‘पू. आजींनी देहत्याग केल्यावर काही वेळाने मी पू. आजींना प्रार्थना केली, ‘तुमच्या सेवेत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर मला क्षमा करा. तुम्ही देत असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ द्या.’ ही प्रार्थना केल्यावर माझ्या आज्ञाचक्रावर पुष्कळ संवेदना जाणवू लागल्या. ‘आज्ञाचक्रातून चैतन्य आत जाऊन माझा हलकेपणा वाढत आहे’, असे मला जाणवत होते. असे १ घंटा चालू होते.’
४. कु. वेदश्री रामेश्वर भुकन (पू. आजींची पणती, वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ अ. पू. आजींच्या सेवेतून आनंद मिळणे : ‘मला पू. आजींच्या सेवेचा आळस कधीच येत नसे. उलट ‘त्यांची सेवा करावी’, असे मला वाटायचे. त्यांच्या सेवेतून मला आनंद मिळायचा.
४ आ. पू. आजींचा देहत्याग झाल्यावर ‘त्यांना मुक्ती मिळणार आहे’, असे जाणवणे : जेव्हा पू. आजींचा देहत्याग झाला, तेव्हा मी त्यांच्या जवळच नामजप करत बसले होते. त्या वेळी ‘त्यांच्या देहातून एक ज्योत बाहेर पडून ती सप्तलोकांच्या दिशेने चालली आहे आणि तिथे पू. आजींना मुक्ती मिळणार आहे’, असे मला जाणवले अन् पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
५. पू. लोखंडेआजींच्या देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सामायिक सूत्रे
अ. ‘पू. लोखंडेआजींनी देहत्याग केल्यानंतर आम्हाला पुढील सर्व विधी भावनिक स्तरावर न रहाता चैतन्याच्या स्तरावर स्थिर राहून करता आले.
आ. आम्हाला अंत्यविधीतून चैतन्य मिळाले आणि आमचे मन हलके झाले.
इ. पू. आजींच्या देहत्यागानंतर त्यांच्या तोंडात तुळशीपत्र ठेवले होते. पूर्ण रात्र उलटल्यानंतरही ते तुळशीपत्र टवटवीत आणि चैतन्यदायी वाटत होते.
ई. पू. आजींचा चेहरा पुष्कळ शांत वाटत होता.
उ. पू. आजींची खोली त्यांच्या देहत्यागानंतर पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ प्रकाशमान दिसत होती.
ऊ. वातावरणात एक वेगळीच शांतता पसरून हलकेपणा जाणवत होता. मन निर्विचार स्थितीला जाऊन शांतता अनुभवता येत होती.
ए. पू. आजींच्या चेहर्याकडे पाहून सहजपणे ध्यान लागत होते. ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटत होते.
ऐ. देहत्यागानंतर त्यांच्या चेहर्यावरचे तेज वाढत गेले. अंत्यविधीच्या वेळी ते पुष्कळच वाढले होते.
ओ. ‘त्यांच्या देहाची हालचाल होत आहे’, असे उपस्थित साधकांना आणि आम्हाला जाणवले.
औ. त्यांचे पार्थिव कडक न होता ते दुसर्या दिवशीही लवचिक होते.
अं. पार्थिवाला स्नान घालतांना ‘ते पुष्कळ पिवळे आणि चैतन्यदायी झाले आहे’, असे जाणवत होते. त्यानंतर त्यांच्या देहाचा पिवळेपणा वाढतच गेला.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.१२.२०२४)