पुण्यात जी.बी.एस्.च्या रुग्णसंख्येत वाढ !

पुणे – गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जी.बी.एस्.) रुग्णांची पुण्यातील एकूण संख्या ७० वर पोचली आहे. त्यांतील १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात अन्यत्रही जी.बी.एस्.चे ३ रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका अन् जिल्हा प्रशासन यांच्याकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्णांचे सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे. जी.बी.एस्.ची लक्षणे दिसून येणार्‍या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथके घेत आहेत. आरोग्य विभागाने शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन केले आहे. या पथकाने रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांची पहाणी चालू केली आहे. आतापर्यंत ७ सहस्र २१५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

रुग्णांचे शौच आणि रक्त यांचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवण्यात येत आहेत. त्यांतील काही रुग्णांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला मिळाले आहेत. त्यात ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ आणि ‘नोरोव्हायरस’ यांचा संसर्ग आढळून आला आहे.

पुण्यातील विविध भागांतील पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक पडताळणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.